सुशांतनंतर दिशा सालियन आत्महत्याप्रकरणही सर्वोच्च न्यायालयात

sushant singh rajput case
सुशांत दिशा सालियन आत्महत्याप्रकरण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अशी मागणी केली आहे की, ‘सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाची तपासणी केली पाहिजे. कारण सुशांतच्या प्रकरणाशी याची लिंक आहे.’ वकील विनीत ढांडा यांनी याचिकेत सांगितले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून सुशांतसोबत दिशाच्या प्रकरणाचे अहवाल मागवावा आणि न्यायालय याबाबत संतुष्ट नसेल तर या प्रकरणाबाबत सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत.’

८ जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरने मुंबईतील राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर एका आठवड्यात १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान आज सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात केंद्र सरकारने बिहार सरकारच्या सीबीआय चौकशीची शिफारस मान्य केली आहे.

सोमवारी याप्रकरणाची बिहार सरकारने सीबीआय चौकशीसाठी शिफारस पाठविली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यादरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतादेखील केंद्राच्या वतीने न्यायालयात उपस्थित होते. एसजी म्हणाले की, ‘बिहारच्या सीबीआय चौकशीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली असून हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले आहे.’

बुधवारी सुशांतच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. सुनावणी दरम्यान सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह यांचे वकील विकास सिंह म्हणाले की, ‘सुशांतचे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी सुशांतच्या वडिलांची इच्छा आहे.’ पुढे विकास सिंह म्हणाले की, ‘बिहार पोलीस तपासासाठी मुंबईला गेले, तेव्हा तिथे एका अधिकाऱ्याला क्वारंटाईन केले गेले. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा फारशी नाही आहे.’


हेही वाचा – सुशांतसिंहची केस सीबीआयकडे; एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली, ‘अखेर तो क्षण आला’