ब्राझीलच्या राष्ट्रपतींना दहा दिवसांपासून लागतेय उचकी, रुग्णालयात दाखल

Brazilian President Jair Bolsonaro hospitalized after 10 days of hiccups
ब्राझीलच्या राष्ट्रपतींना दहा दिवसांपासून लागतेय उचकी, रुग्णालयात दाखल

ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना गेल्या दहा दिवसांपासून सतत उचक्या येत असून त्या थांबण्याचं नावचं घेत नाही आहेत. त्यामुळे बोलसोनारो यांना काल, बुधवारी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आतड्यांमध्ये काही समस्या असल्यामुळे सतत उचक्या येत आहेत. त्यामुळे यासाठी आता एक शस्त्रक्रिया करणे गरजेची पडू शकतं. मात्र शस्त्रक्रिया करण्यास बोलसोनारो यांनी नकार दिला आहे.

यापूर्वी राष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले की, बोलसोनारो (वय ६६) यांना राजधानी ब्राझिलिया येथील ‘आर्म्ड फोर्सेस हॉस्पिटल’मध्ये दाखल केले होते. त्याची तब्येत ठिक आहे. डॉक्टर त्यांच्या उचक्यांच्या समस्येवर उपचार करीत आहेत. परंतु काही तासांनंतर राष्ट्रपती कार्यालयाने पुन्हा सांगितले की, २०१८ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोटावर वार झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सर्जनने त्यांना साओ पाउलो येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे त्यांच्यावर पुढील चाचणी केली जाईल.

बुधवारी ‘हॉस्पिटल नोवा स्टार’ने सांगितले की, ‘राष्ट्रपती ‘कंझर्व्हेटिव्ह क्लिनिकल ट्रीटमेंट’ (विना शस्त्रक्रियेशिवाय उपचार) सुरू आहेत. याचा अर्थ आता त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार नाही.’ दरम्यान बोलसोनारो यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आपल्या रुग्णालयाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत. तसेच बाजूला धार्मिक वस्त्र परिधान केलेला आणि गळ्यात सोन्याचे क्रॉससोबत लांब चैन घातलेला व्यक्तीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे, त्या व्यक्तीचा चेहरा फोटोमध्ये दिसत नाही आहे.

राष्ट्रपती कॅथोलिक आणि इव्हँजेलिकल दोन्ही आहेत. २०१८च्या हल्ल्यात बोलसोनारो यांच्या आतड्यांला जखम झाली होती आणि तेव्हापासून अनेक शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाल्या आहेत. अलीकडे त्यांना अनेक कार्यक्रमात बोलताना समस्या होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ७ जुलैला ‘रेडिओ गुएबा’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती म्हणाले होती की, ‘जे लोकं मला ऐकतं आहेत. मी त्यांची माफी मागतो कारण मला गेल्या ५ दिवसांपासून उचकी येत आहे.’