बंद खोलीत होत होते अत्याचार; विनेश फोगाटचा धक्कादायक आरोप

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

Wfi chief brijbhushan singh files plea against wrestlers vinesh phogat and others

नवी दिल्लीः कुस्तीपटू महिलांवर बंद खोलीत अत्याचार होत होते. ज्या मुलींचे शोषण होत होते त्यांच्याकडे याचे पुरावेही आहेत, असा धक्कादायक आरोप दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटने केला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. मात्र क्रिडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर विनेश फोगाटने धक्कादायक खुलासे केले आहेत.

विनेश फोगाट म्हणाली, सिंह हे महिला कुस्तीपटूंशी संपर्क साधतात. लखनऊमध्ये त्यांचे घर आहे. त्यामुळे महिला कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबिर तेथेच आयोजित केले जाते. जेणेकरून तेथे महिला कुस्तीपटूंचे सहज शोषण करता येते. तेथे महिला कुस्तीपटूंचे शारीरिक व मानसिक शोषण केले जाते. अनेक महिला कुस्तीपटूंचे येथे शोषण झाले आहे.

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष महिला कुस्तीपटूंच्या वैयक्तित आयुष्यात आणि नातेसंबंधात हस्तक्षेप करतात. अध्यक्षांविरोधात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. पाच ते सहा मुलींचे शोषण झाले आहे. त्याचेही पुरावे आहेत. हे पुरावे सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही. सिंह यांचा राजीनामा घ्यायचा आहे. सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना तुरुंगात पाठवायचे आहे, असे फोगाटने माध्यमांशी बोलताना सांगितले.

सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. माझे स्वतःचे यामध्ये नाव आल्याने मी याप्रकरणी कारवाई कशी करु शकतो?, तसेच मी याप्रकरणी चौकशीसाठी तयार आहे, असे  सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ज्या लोकांना कुस्तीमधील काही माहिती नाही अशांना फेडरेशनच्या खुर्चावर बसवले आहे. त्यामुळे महासंघात बदल केला जावा, अशी मागणी ऑलिम्पियन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया याने केली आहे. जोपर्यंत रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बदलले जात नाही तोपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका बजरंग पुनियाने मांडली आहे.