नवी दिल्ली : “जुन्या संसदेत अनेक गोड आणि कडू आठवणी आहेत. जुन्या संसदेतून बाहेर पडणे हा भावनिक क्षण आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आजपासून संसदेचे विशेष आधिवेशन सुरू झाले आहे. हे आधिवेशन पाच दिवस असणार आहे. जुन्या संसदेत आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन संसदेत संसदेचे कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी जुन्या संसदेत भाषण करतान अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि संसदेतील काम करणाऱ्या पत्रकारांपासून ते काम करणाऱ्या सर्वांचे मोदींनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “जुन्या संसद भवनात संघर्ष आणि उत्सवाचे वातावरण अनुभवले. जुन्या संसदेत अनेक गोड आणि कडू आठवणी आहेत. जुन्या संसदेतून बाहेर पडणे हा भावनिक क्षण आहे.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेतोय. पण, जुने संसद भवन येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. भारताचे संसद भवन उभारण्याचे निर्णय ब्रिटीश शासनाचा होता. संसद भवन उभारण्यासाठी पैसे आणि मेहनत भारतीयांची होती,” असे पंतप्रधान मोदींनी संसदेत बोलताना म्हटले.
हेही वाचा – ‘ऐतिहासिक निर्णयांचं हे संसद अधिवेशन’; पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य
…लोकशाहीची ताकद
“मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर संसद भवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवून लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश केला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गरीबाचा मुलगा संसदेत पोहचला हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. देश मला एवढा आशीर्वाद आणि माझ्यावर इतके प्रेम करेल, यांची कल्पना देखील करू शकत नाही,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
हेही वाचा – Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात; काय आहे यामागचा हेतू? जाणून घ्या
भारत जगात ‘विश्वमित्र’च्या भूमिकेत
“चांद्रयान-२च्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन हा आपल्यासाठी सेलिब्रेशनचा विषय आहे. जी-20 परिषदेचे यश हे भारतातील 140 कोटी जनतेचे आहे. भारत जगात ‘विश्वमित्र’च्या भूमिकेत आहे,” असे पंतप्रधान मोदींनी जी-20च्या यशाबद्दल संसदेत म्हणाले.