घरदेश-विदेशब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, सर्वात कमी कार्यकाळाची नोंद

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, सर्वात कमी कार्यकाळाची नोंद

Subscribe

लंडन : ब्रिटनमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्या केवळ ४५ दिवस पंतप्रधानपदावर राहिल्या. त्यांनी 6 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनच्या इतिहासातील त्या सर्वात कमी कार्यकाळ असलेल्या पंतप्रधान बनल्या आहेत. 1827मध्ये टोरी पक्षाचे जॉर्ज कॅनिंग हे 119 दिवस पंतप्रधानपदावर होते.

याआधी अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग आणि भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही लिझ ट्रस मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यांचा आर्थिक कार्यक्रम स्वीकारला न गेल्याने मार्केटमध्ये घसरण झाली आणि त्याच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षातही फूट पडली. उत्तराधिकारी निवडेपर्यंत मी पंतप्रधानपदी राहीन, असे लिझ ट्रस म्हणाल्या.

- Advertisement -

पंतप्रधानपदाच्या प्रचारादरम्यान अर्थव्यवस्था रुळावर आणण्याबाबत लिझ ट्रस यांनी आश्वासने दिली होती. नेमकी तीच त्यांच्या अडचणीची ठरली. महागाई नियंत्रणात आणण्यात ट्रस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. ट्रस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणारे अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, लिझ ट्रस यांना करकपातीसंदर्भातील आपली सर्व धोरणे मागे घ्यावी लागली होती. या धोरणांचा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. राजकीय संकटही अधिक गहिरे झले होेते. या धोरणांवरून त्या विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरल्या होत्या.

क्वार्टेंगच्या निर्णयांमुळे रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था आणि वारंवार होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर नवीन अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी क्वार्टेंगचे जवळजवळ सर्व निर्णय उलटवले. यानंतरही ट्रस सरकारवरील दबाव कमी झाला नाही. त्यांच्याच पक्षाचे खासदारही त्यांच्या विरोधात गेले. ज्या कामासाठी आपल्याला निवडून दिले होते, तेच काम करू शकले नाही, असे ट्रस यांनी म्हटले आहे. त्यांनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आता नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन होणार की ऋषी सुनक, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तर, विरोधी पक्ष लेबर पार्टीने निवडणुकीची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -