नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अनेक नेतेमंडळींनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. काही नेत्यांनी या अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ सुरेश यांनी या अर्थसंकल्पाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. (Budget 2024: Controversial statement of DK Shivakumar’s brother after the presentation of the budget)
हेही वाचा… Raghuram Rajan : आपल्या देशात दोन भारत, एक चीनपेक्षा वेगाने पुढे, तर दुसरा…; वक्तव्य चर्चेत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताच डीके सुरेश यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांसमोर ते म्हणाले की, केंद्राने आम्हाला जे पैसे देणे बाकी आहेत ते जरी आम्हाला दिले तर ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचे घडत आहे, हे आम्ही पाहत आहोत. विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारतात वळवला जात आहे. सर्व बाबतीत आमच्याशी चुकीचे वागले जात आहे, असा आरोपही डीके सुरेश यांनी केला आहे.
आपण जर याचा विरोध केला नाही तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल. हिंदी राज्ये ती करण्यासाठी आम्हाला भाग पाडत आहे, असे वादग्रस्त विधानही सुरेश यांनी केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंतु, त्यांच्या या विधानावर कर्नाटकचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले आहे की, अशाच भावनांमुळे फाळणी झाली, अशी टीका अशोक यांनी केली. मात्र, आता डीके सुरेश यांच्या या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर डीके शिवकुमार याबाबत नेमके काय मत व्यक्त करतात, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.