घरBudget 2024Budget 2024 : काळानुसार बदलली अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा, वाचा सविस्तर

Budget 2024 : काळानुसार बदलली अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा, वाचा सविस्तर

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता. 01 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांसाठी नेहमीप्रमाणे सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि सत्ताधाऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे ऐतिहासिक असा हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. पण काळानुरुप या अर्थसंकल्पात कसा बदल झाला हेही तितकेच औत्स्युक्याचे आहे. कारण अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही परंपरा या आजही कायम आहेत. पण काही गोष्टींमध्ये बदल करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस आधी हलवा सेरेमनी करण्यात येते. ती परंपरा आजही कायम आहे. (Budget 2024: The tradition of presenting the budget has changed with time)

हेही वाचा… Budget 2024 : सीतारामन यांनी बजेट वाचून दाखवलेल्या आयपॅडची किंमत किती; घ्या जाणून…

- Advertisement -

भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. देशाचे पहिले अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी सायंकाळी पाच वाजता तो अर्थसंकल्प सादर केला होता. पण आता गेल्या काही वर्षांपासून हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर करण्यात येत आहे. 1947 ते 1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत सादर केला जात होता. 1955-56 पासून सरकारने ते हिंदीतही प्रकाशित करण्यास सुरुवात केली. हा बदल भारताचे तिसरे अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी केला. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे 1999 पर्यंत अर्थसंकल्प हा सायंकाळी सादर करण्यात येत होता. पण 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने या परंपरेत बदल करत तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता देशासमोर अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. जी परंपरा आजपर्यंत कायम आहे.

2017 पासून भारतात अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीपासून सादर करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, त्याआधी भारताचा अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 28 किंवा 29 फेब्रुवारीला सादर करण्यात येत असे. परंतु, 2017 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून 01 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. 2017 मध्येच अर्थसंकल्पात आणखी एक बदल करण्यात आला, तो म्हणजे रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला जाऊ लागला. आधी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जायचा. पण काळानुरूप रेल्वे बजेटचा वाटा कमी होत गेल्याने 1 फेब्रुवारी 2017 रोजी अरुण जेटली यांनी भारताचा पहिला संयुक्त अर्थसंकल्प सादर केला. यासह 92 वर्षांपासून चालत आलेली परंपरा संपुष्टात आली.

- Advertisement -

हे सर्व महत्त्वाचे बदल अर्थसंकल्पात झालेले तर आहेतच. पण याहीपेक्षा एक महत्त्वाचा बदल झाला आहे, तो म्हणजे, अर्थसंकल्प हा सुरुवातील चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये येत असेल. त्यानंतर तो खतावणीमधून संसदेत आणण्यात येऊ लागला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पापासून बजेटची कागदपत्रे चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये ठेवण्याची परंपरा आहे. 1947 च्या पहिल्या बजेटसाठी लाल रंगाच्या चामड्याचे ब्रीफकेस वापरण्यात आले होते. नंतर काही मंत्र्यांनी काळ्या ब्रीफकेसमध्ये तर काहींनी इतर डिझाइनच्या बॅगमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवली. बॅग आणि ब्रीफकेससाठी नेहमी चामड्याचा वापर केला जात असे.

मात्र, 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा बदलली. त्यांनी पहिल्यांदाच पारंपारिक चामड्याच्या ब्रीफकेसऐवजी लाल रंगाच्या खतावणीमध्ये बजेट सादर केले. पण 2021 पासून निर्मला सीतारामन यांनीच हा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या काळातील या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील पहिला ‘पेपरलेस बजेट’ मांडला. शेकडो पेपर्सची जागा एका टॅबलेटने घेतली. तेव्हापासून सीतारामन त्यांच्या टॅबलेटवरूनच बजेट वाचतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -