Bulli Bai app case: बुल्लीबाई अ‍ॅपप्रकरणी श्वेता सिंगला न्यायालयीन कोठडी ; तिघांच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी

बुल्लीबाई अ‍ॅपप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या श्वेता अनंतपाल सिंग हिची शुक्रवारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर तिला पोलीस बंदोबस्तात भायखळा येथील महिला कारागृहात नेण्यात आले. याच प्रकरणातील एक आरोपी कुमार विशाल सुधीरकुमार झा याच्यानंतर दुसरा आरोपी मयांक प्रदीपसिंह रावत याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

बुल्ली बाई अ‍ॅपप्रकरणी सायबर सेल पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी बंगलोर येथून विशाल तर उत्तराखंड येथून श्वेता आणि मयांक या तिघांना अटक केली होती. याच गुन्ह्यांत श्वेता आणि मयांक हे दोघेही १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यावेळी मयांकला कोरोनाचे लक्ष दिसू लागल्याने त्याला तातडीने कालिना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर तिथे सध्या उपचार सुरु आहे.

यापूर्वी विशाल झा याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शुक्रवारी दुपारी श्वेताला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी श्वेताची पोलीस कोठडीतून न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या तिघांच्या जामिनावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.


हेही वाचा : पालिकेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना ३९ कोटींचे टॅब ; भाजपच्या विरोधाला न जुमानता प्रस्ताव मंजूर