सेंधवा : मध्य प्रदेश परिवहनच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील बिजासण घाटात ही घटना घडली. आज (ता. 01 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मध्य प्रदेश परिवहनच्या बसला मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ट्रकने या बसला धडक दिली, त्या ट्रकचे ब्रेक फेल झाले होते आणि ज्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Bus-truck accident on Mumbai-Agra National Highway No.3)
हेही वाचा – Aparna P Nair Death : मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरचा मृत्यू; घरात संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील बिजासण घाटात मध्य प्रदेश परिवहन विभागाची इंदौर नाशिक बस आणि ब्रेकफेल झालेल्या बसचा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेश परिवहनची ही बस सेंधवाहून शिरपूरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच बिजासण पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्राथमिक मदकार्य करण्यात आले. तसेच, घटनेतील जखमींना सेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात ट्रकने बसला इतकी जोरदार धडक दिली की ज्यामुळे बस पलटली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले असून बसमधील 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु जखमींमधील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने आता वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.