जयपूर : CC Cricket World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात सलग 10 सामने जिंकून सुद्धा भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत करत विश्वचषक 2023 स्वतःच्या नावे केला. यामुळे 140 करोड भारतीयांची मने दुखावली आहेत. स्वतः कर्णधार रोहित शर्मा याला त्याचे रडू आवरता आले नाही. पण या पराभवाला काही नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवले आहे. पंतप्रधान स्टेडियममध्ये जाण्याआधी भारताला ऑस्ट्रेलियाचे तीन गडी काही वेळातच बाद करण्यात आले होते, पण मोदी स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर एकही खेळाडू बाद झाला नाही, त्यामुळे ते पनौती आहेत, असे मॅसेज लोकांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात येऊ लागले. पण आता तर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी देखील सामना पराभूत होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना जबाबदार धरले आहे. मोदींचे नाव न घेता राहुल यांनी त्यांना पनौती म्हटले आहे. (“…but Panauti defeated”, Rahul Gandhi’s indirect criticism of PM Narendra Modi)
हेही वाचा – IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरसह ‘हे’ दिग्गज खेळाडू भारताविरुद्ध T20 मालिका खेळणार नाहीत
राजस्थानमध्ये येत्या 23 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. राहुल गांधी हे आज (ता. 21 नोव्हेंबर) जयपूरमधील जालोर येथे एका प्रचार सभेला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. पण याचवेळी त्यांनी भारत-ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचाही उल्लेख केला. राहुल गांधी यांचे भाषण सुरू होताच सभेला आलेल्या समुदायाने पनौती… पनौती अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, बरं वाईट काही का असेना. आपली टीम जिंकली असती. पण पनौतीने पराभूत केले. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला सर्व माहीत आहे, असे वक्तव्य करत राहुल गांधी यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियावर #पनौती ट्रेंड झाले. ज्याचा आधार घेत विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला. पण आता राहुल यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून त्यांनी राहुल गांधींना मोदींची माफी मागण्यास सांगितले आहे.
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023
ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 54, रोहित शर्मा 47 धावांचे आणि सूर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.