घर देश-विदेश Bypoll Results 2023 : UPतील घोसीमध्ये BJP ची पिछेहाट, केरळमध्ये काँग्रेस; जाणून...

Bypoll Results 2023 : UPतील घोसीमध्ये BJP ची पिछेहाट, केरळमध्ये काँग्रेस; जाणून घ्या सात जागांची स्थिती

Subscribe

नवी दिल्ली – सहा राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा देशातील मोठा मुकाबला मानला जात आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेनंतरची ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) इंडिया आघाडीला दोन मतदारसंघात मात दिली आहे. त्यामुळे सध्यातरी एनडीए आघाडीवर आहे.

भारतीय जनता पक्षाने त्रिपुरामधील दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. धनपूर आणि बॉक्सनगर या विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआय (एम) उमेदवारांचा पराभव केला आहे. धानपूरमध्ये भाजपने १९ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्रिपूरातील दोन्ही जागांवर काँग्रेसने उमेदवार न देता सीपीआय (एम)ला पाठिंबा जाहीर केला होता.

- Advertisement -

आतापर्यंतचा निकाल
त्रिपूरातील बॉक्सनगर मतदारसंघात भाजप उमेदवार तफ्फजल हुसैन यांना 30,237 मते मिळाली आहेत. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मिजान हुसैन यांना फक्त 3909 मते पडली. या मतदारसंघात जवळपास 66 हजार मतदार हे अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे येथे भाजपच्या विजयाचे वेगळे महत्त्व आहे. त्रिपुरातील दुसरा धनपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार बिंदू देबनाथ यांचा विजय झाला आहे. त्यांनी सीपीआय (एम)चे कौशिक चंदा यांचा पराभव केला आहे. भाजप उमेदवार बिंदू यांना 30017 मते मिळाली, तर सीपीआय(एम) उमेदवार कौशिक चंदा यांना 11146 मते मिळाली. भाजप उमेदवाराचा तब्बल 18871 मतांनी विजय झाला आहे.

त्रिपुरात याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनपूरमध्ये भाजपच्या प्रतिमा भौमिक यांचा विजय झाला होता. त्यांनी सीपीआय (एम) च्या कौशिक चंदा यांचा चार हजार मतांनी पराभव केला होता. भाजप उमेदवाराला 19148 मतांसह 42.25 टक्के मते मिळाली होती तर सीपीआय (एम)च्या चंदा यांना 15648 मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी 34.53 टक्के होती. यामध्ये पोटनिवडणुकीत मोठी घट झाली असून 26.12 टक्केच मते सीपीआय (एम)च्या चंदा यांना मिळाली आहेत.

- Advertisement -

बॉक्सनगरची जागा सीपीआय(एम)च्या ताब्यातून गेली आहे. मागील निवडणुकीत भाजप येथे दुसऱ्या क्रमांकावर होता. यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत सीपीआय (एम)चे उमेदवार समसूल हक यांना 50 टक्क्याहून अधिक (19404) मते मिळाली होती. तर भाजप उमेदवार तफ्फजल हुसैन यांना 14555 मते (37.76%) मिळाली होती. ही जागा सीपीआय (एम) कडून खेचून घेण्यात भाजपाला यश आले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये राजकारण तापले
उत्तर प्रदेशमधील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत आतापर्यंत 14 राऊंड झाले आहेत. येथे समाजवादी पार्टीचे उमेदवार सुधाकर सिंह यांनी त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार दारासिंह चौहान यांच्यावर 19028 मतांनी आघाडी घेतली आहे. सुधाकर सिंह यांना आतापर्यंत 54963 मते मिळाली आहेत. तर चौहान यांना 35935 मते मिळाली आहेत. मतमोजणी अजून सुरु आहे. त्यासोबतच येथे राजकारणही तापले आहे.
समाजावादी पार्टीचे महासचिव स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, ‘घोसीची जनता आपल्या अपमानाचा बदला घेत आहे. ज्यांनी जनतेला धोका दिला होता, त्यांना धडा शिकवण्याचा जनतेचा प्रण घेतला आहे. सपाचा येथे पहिलेही विजय झाला होता, आताही विजय होईल.’

उत्तराखंडमध्ये भाजपचे कमळ
उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार पार्वती दास यांनी काँग्रेसच्या बसंतकुमार यांचा पराभव केला आहे. पार्वती दास यांचा 2810 मतांनी विजय झाला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. बागेश्वर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला आशीर्वाद देत कमळ फुलवले आहे. धामी म्हणाले, बागेश्वरच्या जनतेने जो विश्वास भाजपावर दाखवला आहे, त्याला पात्र ठरण्याचा आमचा प्रयत्न राहील. दिवंगत चंदन दास यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न राहाणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये दीदीची जादू कायम
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधील धूपगुडी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेस (टीएमसी) उमेदवाराचा विजय झाला आहे. टीएमसी प्रवक्ते रिजू दत्ता म्हणाले, धूपगुडीच्या जनतेने दाखवून दिले आहे की पश्चिम बंगालची जनता ममता दीदीसोबत आहे.

झारखंडमधील डुमरी विधानसभा पोटनिवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवार बेबी देवी या 15273 मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisment -