बंगालमध्ये सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, दोन जणांचा मृत्यू

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हिंसक आंदोलनात झाले असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे.

सीएए विरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. हा कायदा मागे घ्यावा यासाठी नागरिकांसह विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील जलांगी भागात बुधवारी तृणमूल काँग्रेस आणि स्थानिक नेते व नागरिक यांच्यात याच मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर वादाचे रुपांतर बाचाबाचीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांत तुफान हाणामारी सुरू झाली. यात लाथाबुक्क्यांबरोबरच लाठ्या काठ्यांचाही वापर करण्यात आला. यात दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.