रेल्वे कर्मचार्‍यांना बोनस म्हणून ७६ दिवसांचे वेतन मिळणार

Diwali Bonus

दसर्‍यापूर्वीच रेल्वे कर्मचार्‍यांना केंद्र सरकारने दिवाळी जाहीर केली आहे. राजपत्रित नसलेल्या सर्व रेल्वे कर्मचार्‍यांना ७६ दिवसांचे वेतन उत्पादनक्षमता आधारित बोनस म्हणून मंजूर केला आहे. त्याचा फायदा ११.५६ लाख राजपत्रित नसलेल्या कर्मचार्‍यांना होणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. वर्षानुवर्षे, प्रोडक्टिविटी लिंक बोनस रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचार्‍यांना मिळत असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योगासाठी मित्रा योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. टेक्सटाईल मेगा पार्कसाठी सुमारे 4500 कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. ठाकूर म्हणाले की, वस्त्रोद्योगासाठी पीएम मित्र योजना सुरू करण्यात आलीय, यासाठी देशभरात 7 मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. तसेच यावर 4445 कोटी खर्च केले जातील. यामुळे कापड आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होईल. पीयूष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योगात निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने सात मोठे निर्णय घेतलेत. यापैकी सहा निर्णय आधीच घेतले गेलेत. आज या उद्योगासाठी सातवा निर्णय घेण्यात आला.

पीयूष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योगासाठी आज पीएम मित्र योजना सुरू केली जात आहे. सरकार यासाठी ‘5F’ संकल्पनेवर काम करीत आहे. सध्या वस्त्रोद्योग एकात्मिक नाही. यामध्ये उत्पादन इतरत्र होते, कच्चा माल कुठेतरी येतो. अशा प्रकारे त्याची किंमत लक्षणीय वाढते. टेक्सटाईल पार्कच्या मदतीने कापड उद्योगासाठी सर्व कामे एकत्रित केली जातील.