अमेझॉन वरून गांजाचा धंदा, दोघांना अटक

ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गांजाची विक्री

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये गांजाची ऑनलाईन तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २० किलो गांजा जप्त केला आहे. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गांजाची मोठी तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर या प्रकरणी २० किलो गांजासह तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉनच्या माध्यमातून विशाखापट्टनमवरून मध्य प्रदेशमध्ये कडी पत्त्याच्या नावाखाली गांजाची ही तस्करी होत होती. आतापर्यंत एक टन गांजाची तस्करी झाल्याचे उघडकीस आले आहे.

भिंडचे पोलीस अधिक्षक(एसपी) मनोज कुमार सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सूरज उर्फ कल्लू (३०)आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर (३५) या दोन आरोपींनी अटक करण्य़ात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २० किलोचा गांजा जप्त केला आहे. २० किलो गांजाची एक खेप विशाखापट्टनमवरुन अमेझॉनच्या माध्यमातून मागवल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून अमेझॉन ऑनलाईनच्या माध्यमातून ही तस्करी सुरू होती. त्यामुळे एक टन गांजाची तस्करी करण्यात आली असून त्याची किंमत एक कोटी दहा लाख रूपये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, दोन आरोपींच्या चौकशीनंतर अजून एका सहकार्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीचं नाव सूरज असं आहे. सूरजने कडी पत्ता उत्पादनाचा विक्रेत्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर त्याला अमेझॉनवर बारकोड मिळाला. त्यानंतर एका कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली ही हर्बल उत्पादनं पुरवली जात असत.


हेही वाचा: गडचिरोलीत १०० हून अधिक नक्षली लपल्याचा अंदाज, पोलिसांची माहिती


CAIT इंडियाने या घटनेची दखल घेतली असून त्यांनी अमेझॉनकडून खुलासा मागितला आहे. अमेझॉनच्या माध्यमातून अशा प्रकारचा अवैध व्यापार होत असून तो घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.