पुरुषांनो सांभाळा, ‘सेक्स हार्मोन्स’मुळे करोनाचा तुमच्यावर डोळा

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने आतापर्यंत ७०० जणांचा बळी घेतला असून हजारो जणांना याची लागण झाली आहे. पण जगभरात हाहाकार उडवणाऱ्या या करोनाचा सर्वाधिक धोका महिलांच्या तुलनेत पुरुषांना असल्याचा दावा चीनमधील एका डॉक्टरने केला आहे. यामुळे पुरुषवर्गात भीतिचे वातावरण पसरले आहे.

चीनमधील जिन्यियान रुग्णालयात काम करणाऱ्या या डॉक्टरचे नाव ‘ली झांग; असे आहे. करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अधिक असल्याचे चीनमधील सद्य परिस्थितीवरून स्पष्ट झाल्याचा दावा झांग यांनी केला आहे. ‘एक्स क्रोमोझोम’ आणि ‘सेक्स हार्मोन्स’मुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती अधिक असते यामुळे करोनाची लागण पुरुषांना लवकर होते असे झांग यांनी म्हटले आहे. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ९९ टक्के पुरुष असून महिलांचे प्रमाण अल्प असल्याचे संशोधनातून निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चीनमधील वुहान शहरात करोनाचा संसर्ग जेव्हा सुरू झाला तेव्हापासूनच पुरुष रुग्णांची संख्या अधिक होती. यात अधिक वाढ झाली असून आता चीनमध्ये ७.८०० जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ७०० जणांचा यात मृत्यू झाला आहे. चीननंतर अमेरिका, जपान, थायलँड आणि जर्मनीसारख्या देशातही करोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे करोनाला रोखण्यासाठी जगभरातील डॉक्टर प्रयत्न करत असून लवकरच करोनावर नियंत्रण मिळवू असा विश्वास चीनमधील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.