याच आठवड्यात प्रकरण संपवायचे आहे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Aggressive argument of Shinde group's lawyers in Supreme Court

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. गेल्या आठवड्याप्रमाणे आजही (मंगळवारी) ठाकरे गटाकडून यु्क्तिवाद करण्यात आला. आता शिंदे गटाने दोन दिवसांत युक्तिवाद पूर्ण करण्याची सूचना करून याच आठवड्यात प्रकरण संपवायचे आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करत अनेक कायदेशीर मुद्दे न्यायालयात मांडण्यात आले. आज देखील ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तासभर युक्तिवाद केला. पक्ष फुटीवर राज्यपालांनी निर्णय घेतला, मग न्यायालय निर्णय का घेऊ शकत नाही? जे न्यायालयाचे काम नाही, ते राज्यपालांनी कसे केले? शिवसेनेत फूट पडल्याचे राज्यपालांनी कशावरून ग्राह्य धरले? त्यातही त्यांनी बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलावले, मग ते कशाच्या आधारे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

त्यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरू केला. गुवाहाटीमध्ये बसून शिंदे गटाने आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदावर नियुक्ती केली होती. त्यासंबंधीचे पत्र देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोर सादर केले. ‘शिवसेना विधिमंडळ पक्ष’ असे लेटरहेड असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सांगितले की, प्रतोद हा राजकीय पक्षाकडून नियुक्त केला जातो. तो कोण असेल, हे ठरविण्याचा संसदीय कामकाजाशी संबंध नाही. म्हणूनच शिंदे गटाकडून दिलेले हे पत्र राजकीय पक्षाचे नसून विधिमंडळ पक्षाचे आहे.

येत्या गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होणे, अपेक्षित आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करतील. गुरुवारी दुपारी दोनपर्यंत सॉलिसिटर जनरल हरिष साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील तर त्यानंतर शेवटचे दोन तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील रिजॉइंडरसाठी बाजू मांडतील.