केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूह आणि दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत. आयसीआयसीआय बॅंकेतून व्हिडिओकॉन कंपनीला ३२५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. या कर्जवाटपासंबंधात ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – आयसीआयसीआयच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला
काय आहे नेमकं प्रकरण?
चंदा कोचर आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ पदी असताना व्हिडिओकॉन कंपनीला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यावेळी व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबल कंपनीत ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे चंदा कोर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. दरम्यान, सीबीआयने मार्च २०१८ मध्ये वेणूगोपाल धूत, दीपक कोचर आणि इतर लोकांची चौकशी सुरु केली होती. याच प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयने गुरुवारी व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबादमधील कार्यालयांवर छापा टाकला आहे.
हेही वाचा – चंदा कोचर प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई