कोळसा घोटाळाप्रकरणी सीबीआयची पश्चिम बंगालच्या कायदामंत्र्यांच्या घरी छापेमारी

कोलकाता : कथित कोळसा तस्करीप्रकरणी सीबीआयने पश्चिम बंगालचे कायदेमंत्री मलय घटक यांच्या तीन निवासस्थानांसह सात ठिकाणी छापे टाकले. विशेष म्हणजे, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे मंत्री तसेच आमदार सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दोनच दिवसांपूर्वी चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूलचे आमदार सुबोध अधिकारी आणि त्यांच्या बंधूंच्या निवासस्थांनांवर छापे टाकले होते.

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या खाणींमधील कथित कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. सीबीआयने नोव्हेंबर 2020मध्ये अनुप मांझी ऊर्फ लाला, ईसीएलचे महाव्यवस्थापक अमित कुमार धर आणि जयेशचंद्र राय, ईसीएलचे सुरक्षाप्रमुख तन्मय दास, कुनुस्तोरिया क्षेत्राचे सुरक्षा निरीक्षक धनंजय राय आणि काजोर परिसराचे सुरक्षा प्रभारी देवाशीष मुखर्जी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

याप्रकरणी सीबीआयने पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील आसनसोलमधील तीन घरे तसेच कोलकाताच्या लेक गार्डन परिसरातील एका घरावर छापे टाकले, अशी माहिती आहे. कोळसा तस्करी प्रकरणी मलय घटक यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे यात त्यांची भूमिका नेमकी काय होती, हे जाणून घ्यायची आवश्यकता आहे. या घोटाळ्यात घटक यांचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत. ज्यावेळी ही छापेमारी करण्यात आली तेव्हा मलय घटक कोठेही आढळले नाहीत, असे एका सीबीआय अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले. या छापेमारीच्या वेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्या निवासस्थांनांना घेरले होते.

सीबीआयने मलय घटक यांची याप्रकरणी अनेकदा चौकशीसाठी पाचारण केले होते. परंतु प्रत्येक वेळी कोणते ना कोणते तरी कारण देत, ही चौकशी त्यांनी टाळली होती. त्यानंतर आज सीबीआयने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. याप्रकरणाची चौकशी सीबीआयसह सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देखील सुरू केली आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी तसेच त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.