नवी दिल्ली : सरकारी निवासस्थानाच्या बांधकाम प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुशोभिकरणासाठी झालेल्या खर्चाचीही उपराज्यपालांनी दखल घेतली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार आहे. या प्रकरणी केंद्रीय एजन्सीने दिल्ली सरकारकडे फाइल मागवली आहे. त्यामुळे जर सीबीआयला पुरावे सापडल्यास नियमित गुन्हा किंवा फौजदारी गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मद्य परवाना घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणासाठी सीबीआय सरसावली असल्याचे पाहायला मिळत आहे. (CBI to probe Kejriwals bungalow renovation Already in DCM jail now CM is the target)
हेही वाचा – Old Pension Scheme : ‘रामलिला’तून घुमणार जुन्या पेन्शन योजनेचा आवाज; सकारी कर्मचारी दिल्लीकडे
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बांधकाम आणि ‘नूतनीकरण’मधील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने नोंदवलेल्या प्राथमिक चौकशीवर आम आदमी पक्षाने म्हटले की, ‘भाजपाने आम आदमी पार्टीला नष्ट करण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेराव घालण्यासाठी सर्व तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, पण दिल्लीतील 2 कोटी जनतेचा आशीर्वाद अरविंद केजरीवाल यांच्यावर आहे. या तपासातून काहीही निष्पन्न होणार नाही. भाजपाने कितीही तपास केला तरी अरविंद केजरीवाल सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहतील, असे आपने स्पष्ट केले आहे.
गरिबांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळू नये यासाठी भाजपाकडून प्रयत्न
‘आप’ने भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, आम आदमी पार्टीला नष्ट करण्यासाठी भाजपाने आपली सर्व ताकद लावली आहे. आज संपूर्ण देशात फक्त आम आदमी पक्ष आहे, जो शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करून मते मागत आहे. पण गरिबांना चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य सुविधा मिळू नये, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भाजपाच्या धर्म आणि जातीच्या राजकारणाचा पराभव होणार आहे. याच कारणामुळे देशातील सर्वोत्तम शिक्षण आणि आरोग्य मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोपही आपने केला आहे.
हेही वाचा – Hardeep Nijjar killing : अजित डोवल यांनी कॅनडाच्या NSA कडे मागितले पुरावे; कोणतंही उत्तर नाही
काय प्रकरण आहे?
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणावर 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप दिल्ली भाजपाने केला होता. काही महिन्यांपूर्वी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये केजरीवाल यांच्या बंगल्यातील फोटो समोर आले होते. हे फोटो अशावेळी समोर आले जेव्हा दिल्ली गंभीर कोरोना महामारीशी झुंजत होती. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट करत लिहिले की, ‘केजरीवाल यांच्या बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या काळात केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेच्या पैशातून बेकायदेशीर काचेचा महाल बांधण्याचे पाप केले आहे, या गुन्ह्याच्या शिक्षेपासून केजरीवाल सुटू शकत नाहीत.’