कोरोनाचा देशात फैलाव, १० राज्य केंद्र सरकारच्या टार्गेटवर!

corona positive

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर रोज जवळपास १० हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताची इटलीला देखील मागे टाकून आता आठव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातल्या ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा मोठा प्रसार झाला आहे, अशा एकूण १० राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचा समावेश आहे.

जिल्हानिहाय नियोजन करण्याचे निर्देश

देशातच्या ज्या १० राज्यांमध्ये कोरोनानं थैमान घातलं आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला असून त्यासाठी त्या त्या राज्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांची सोमवारी आरोग्य विभागातले वरीष्ठ अधिकारी, या १० राज्यांमधल्या विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, जिल्हा रुग्णालय अधीक्षकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. यावेळी संबंधित १० राज्यांना जिल्हानिहाय नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासोबतच कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमधल्या कोरोना रुग्णांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या राज्यांमधल्या एकूण ३८ जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या घ्याव्या लागणाऱ्या चाचण्या आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.