घरताज्या घडामोडीतपास यंत्रणांमुळे केंद्र सरकार मालामाल, कोट्यवधींचे घबाड हाती

तपास यंत्रणांमुळे केंद्र सरकार मालामाल, कोट्यवधींचे घबाड हाती

Subscribe

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय वर्तुळातून केला जात आहे. तर दुसरीकडे यंत्रणांच्या माध्यमातून कोटींचे घोटाळे समोर येत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा आता चित्रपट निर्मात्यांसह कारख्यांन्यावर देखील वळवला आहे.

जालन्यात आज आयकर विभागाने मोठी धाड टाकली असून मागील १ ऑगस्टपासून हे धाडसत्र सुरू होते. जवळपास ८ दिवस कारवाई केल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये ३ रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत तब्बल ३९० कोटींची रोकड हाती लागली आहे. कारखानदारांच्या घरावर, कार्यालयावर आणि फार्महाऊसवर धाड टाकल्यानंतर हे घबाड हाती लागले आहे.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू असतानाच ऑगस्ट महिन्यात चित्रपट निर्माते, वितरक आणि वित्त पुरवठादारांचे कार्यालय अशा ४० ठिकाणांवर आयटी विभागाने धाडी टाकल्या होत्या. यामध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. हे धाडसत्र प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपट चेन्नई, मदुराई, कोईम्बतूर आणि वैल्लूर येथे सुरू होतं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई करण्यात येत होती. शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. परंतु शिक्षणमंत्री असताना त्यांना अटक करण्यात आली. जुलै महिन्यात पार्थ चॅटर्जी यांना ईडीने शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने चॅटर्जी यांच्यासह १२ जणांच्या घरांवर छापेही टाकले होते. एका छाप्यात चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपयांच्या नोटा आणि अन्य मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच, अर्पिता यांच्या दुसऱ्या घरातूनही २७ कोटी ९० लाख रुपये आणि ६ किलो सोने सापडले होते.

- Advertisement -

येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. ही मालमत्ता पुण्यातील व्यावयासिक अविनाश भोसले आणि बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने भोसले यांच्याशी संबंधित १६४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तर छाब्रिया यांच्याशी संबंधीत २५१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत १८२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने जुलै महिन्यात आपला मोर्चा नीरव मोदींकडे वळवला होता. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने नीरव मोदी यांच्याशी संबंधित कंपनी, हिरे, दागिने, बँक ठेवी यांच्यासह एकूण २५३.६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०२२ अशा ९ वर्षांच्या कालावधीत ईडीच्या छाप्यांमध्ये २७ पटीने वाढ झाली आहे. या कालावधीत ३०१० इतकी छापेमारींची संख्या असून २००४ ते २०१४ सालापर्यंत धाडींची संख्या ११२ इतकी होती. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ मध्ये लागू करण्यात आला होता. परंतु १ जुलै २००५ साली हा कायदा लागू करण्यात आला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत १ लाख कोटी रुपये ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत.

कानपूरमधील परफ्यूम व्यापारी पियूष जैन यांच्या घरातून १७५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. जीएसटी इंन्टेलिजन्सने (DGGI)जैन यांच्या निवासस्थान आणि कारखान्यातून २३ किलो सोने आणि ६०० किलो चंदन तेल जप्त करण्यात आले होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकांकडून ईडीने १० कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केली होती. हा छापा अवैध वाळू उत्खननाच्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाशी संबंधित होता. त्यानंतर दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन, त्यांची पत्नी पूनम जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मनी लॉन्ड्रिंगमध्ये २.८२ कोटी रुपये रोख आणि १.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते.

दरम्यान, एकीकडे ईडी, आयकर विभाग अशा केंद्रीय तपास यंत्रणांकडून कोटींचे घभाड मिळताना दुसरीकडे देशातील सार्वजनिक आणि खासगी बँकेकडे ४८ हजार कोटी रूपयांची संपत्ती पडून आहे. मात्र, या संपत्तीचा मालक कोण?, याचे उत्तर किंवा ती व्यक्ती आरबीआयला अद्यापही भेटलेली नाहीये. दरम्यान, यासंदर्भात आरबीआय शोध घेत आहे.


हेही वाचा : जालन्यातील बडे स्टील व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर ; 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -