Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण

nitin gadkari

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना आता कोरोनानं केंद्रीय मंत्रिमंडळात देखील प्रवेश केला आहे. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, अधिवेशन सुरू असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द नितीन गडकरी यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली आहे. रात्री ९ वाजून ३२ मिनिटानी नितीन गडकरींनी यासंदर्भातलं ट्वीट केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेतेमंडळींसोबतच सर्वपक्षीय सदस्यांकडून नितीन गडकरींच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, आपण स्वस्थ असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं देखील गडकरींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

‘काल मला जरा अस्वस्थ आणि अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझी तपासणी झाल्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या माझी प्रकृती चांगली असून सगळ्यांच्या प्रार्थना आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे’, असं गडकरींनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.