नेहरु यांच्यामुळे चहावाला झाला पंतप्रधान – शशी शरुर

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंडित नेहरू यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Shashi Tharoor Book
खासदार शशी थरुर यांच्या पुस्तकाची नवी आवृत्ती

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताची जी जडणघडण केली. अनेक धोरणे आखली. या धोरणांमुळेच एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान बनू शकला आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले आहे. नेहरूंच्या संस्थात्मक रचनेमुळे भारतातील कोणताही सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचू शकतो, असेही ते म्हणाले. नेहरू यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला शशी थरुर यांचे २००३ सालातील ‘नेहरु : द इनव्हेन्शन ऑफ इंडिया’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी थरूर यांनी ही भूमिका व्यक्त केली.

नेहरूंजीचे योगदान विसरता येणार नाही

या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना थरुर म्हणाले की, पंडित नेहरुबद्दल नेहमीच खोटी माहिती पसरवली जाते. जुन्या फोटोंचा चुकीचा संदर्भ देऊन त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. विकृत लिखाण करुन चारित्रहनन केले जाते. मात्र नेहरुंनी देशासाठी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत थरूर यांनी व्यक्त केली. तसेच भारताने मंगळयान उपग्रह सोडला. इस्रोने हे काम केले होते. इस्रोची स्थापना कुणी केली? आपल्यासारखा गरिब देशही ही झेप घेऊ शकेल, असा विचार कुणी केला? सिलिकॉन व्हॅलीमध्ये आज ४० टक्के भारतीय स्टार्टअप आहेत, जे भारताच्या आयआयटीमधून शिकलेले आहेत. आयआयटी स्थापन करण्याचा निर्णय कुणी घेतला? हे सर्व पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केले. हे लक्षात ठेवले पाहीजे, असे थरूर यावेळी म्हणाले.

नेहरू म्हणायेच, हा देश फक्त हिंदूचा नाही – सोनिया गांधी

नेहरूंचा वारसा वादातीत करण्याचा प्रयत्न आजचे सत्ताधारी करत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांनी केली. “हा देश फक्त हिंदूचा नसून सर्वांचा आहे. त्यामुळे सर्व समुदायांचे हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपली आहे.”, अशी धारणा नेहरूंची असल्याचे गांधी यांनी सांगितले.