मुंबई : चंदिगढमध्ये जे घडवले ती भाजपाची सरळ सरळ गुंडगिरी आहे. फसवणूक आणि बेइमानी केल्याशिवाय भाजपा महापौरपदाची एक निवडणूक जिंकू शकत नाही, तो भाजप गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आहे आणि 2024 साली पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा करत आहे. चंदिगढ महापौरपदाच्या निवडणुकीत जे भयंकर घडले ते 2024च्या निवडणुका कशा होतील आणि निकालानंतर संसदेत काय खलनायकी नाट्य घडू शकेल याचे प्रात्यक्षिक आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – GST Collection : जानेवारीत जीएसटी संकलनात दमदार वाढ, अर्थसंकल्पापूर्वीच चांगली बातमी
चंदिगढ महापौर निवडणुकीत आप आणि काँग्रेसची मिळून 20 मते होती, भाजपची 16 मते होती. तरीही पीठासीन अधिकाऱ्याने भाजपाचा महापौर जिंकल्याचे जाहीर केले आणि त्यासाठी आपची आठ मते बाद करून सभागृहातून पलायन केले. लोकशाहीतला हा ‘हॉरर शो’ चित्रित झाला व जगाने भाजपाचा हा दळभद्री प्रकार पाहिला, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुरते वस्त्रहरण रोजच होत आहे, पण सत्तातुरांना ना लाज, ना भय. चंदिगढ महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे. चंदिगढच्या महापौर निवडणुकीतील भाजपाचा विजय हा बेइमानी आणि झुंडशाहीचा विजय आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने चंदिगढमध्ये शरमेने मान खाली घातली आणि लोकशाहीची ही हत्या गांधी जयंतीच्याच दिवशी झाली. याच दिवशी एका गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि याच दिवशी गोडसे वंशजांनी चंदिगढमध्ये लोकशाहीची हत्या केली, असा घणाघात या अग्रलेखात करण्यात आला आहे.
हेही वाचा – NCP : शरद पवार पक्षाचे सदस्यच नाहीत! अजित पवार गटाकडून नवा युक्तिवाद, आता प्रतिक्षा निकालाची
अयोध्येत राम प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी 11 दिवसांचे व्रत केले, उपासतापास केले. रामाच्या नावाने नौटंकी तर चांगलीच केली, पण रामाचे सत्यवचन मात्र त्यांच्या अंगी आलेले दिसत नाही. राम वनवासात निघाले तेव्हा रामाने भरतास अयोध्येचे राज्य लोकशाही मार्गाने चालवण्याचा मंत्र दिला, पण भाजपासारख्या नकली रामभक्तांनी रामाचे सत्यवचन, लोकशाहीचा मुडदाच पाडला, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.