जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही

पत्नीबद्दलच्या अनुद्गारामुळे चंद्राबाबू ढसाढसा रडले

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधार्‍यांनी पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने तेलुगू देसम पार्टीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू प्रचंड व्यथित झाले. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसढसा रडले. यावेळी त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही, असा पणच त्यांनी केला.

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांकडून चंद्राबाबू नायडूंबद्दल सातत्याने अपशब्द वापरले जात आहेत. त्यात त्यांच्या पत्नीबद्दलही अनुद्गार काढण्यात आल्याने चंद्राबाबू प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पायच ठेवणार नसल्याची शपथ घेतली.

या सर्व प्रकरणावर भाष्य करण्यासाठी त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांनी सत्ताधार्‍यांनी त्यांच्या पत्नीबाबत काढलेल्या अपशब्दांबाबत बोलायला सुरुवात केली. त्याबाबत बोलत असताना चंद्राबाबूंना अचानक भावना अनावर झाल्या आणि ते अक्षरश: रडायला लागले. मी गेल्या चार दशकांपासून भारतीय राजकारणात आहे. पण माझ्याशी कोणीच एवढे अपमानास्पद वागले नाही, असे त्यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू होती. यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी नायडू आणि त्यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यावर नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षांपासून मी हा अपमान सहन करत आहे. आज तर त्यांनी माझ्या पत्नीलाच टार्गेट केले आहे. मी नेहमीच सन्मानासाठी आणि सन्मानाने राहिलो. मात्र, आता मी अधिक सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले. सत्ताधार्‍यांनी माझ्या पत्नीवर निशाणा साधला आहे. मी माझ्या कुटुंबाचे चारित्र्य हनन सहन करू शकत नाही, असेही ते म्हणाले. नायडूंची पत्नी एनटी रामाराव यांची मुलगी आहे. एनटी रामाराव यांनी टीडीपीची स्थापना केली होती. ते दोनदा सत्तेत आले होते.