घरदेश-विदेश२३ मे नंतर किंगमेकर कोण? विरोधी पक्षांचा सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

२३ मे नंतर किंगमेकर कोण? विरोधी पक्षांचा सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

Subscribe

तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी भाजप विरोधातील पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. २३ मे नंतर निकाल भाजपच्या विरोधात गेल्यास तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न नायडू करताना दिसत आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट घेतली. २३ मे रोजी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आघाडीचे चित्र कसे असेल? याबाबत दिल्लीत खलबतं सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यापूर्वी नायडू यांनी भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. यात सीपीआयचे नेते सुधाकर रेड्डी, सीपीआय(एम) सीताराम येचूरी, आपचे अरविंद केजरीवाल, लोकतांत्रिक जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांचीही भेट घेतली होती. राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर नायडू समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांची त्यांनी भेट घेतली.

- Advertisement -

सतराव्या लोकसभेसाठी सहा टप्प्यांमध्ये ४८३ जागांसाठी मतदान पुर्ण झाले आहे. उद्या (१९ मे) लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच देशातील विरोधी पक्षांनी एकजुट व्हायला सुरुवात केली आहे. नायडू ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने भाजप विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यावरून तरी ते तिसऱ्या आघाडीची मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. नायडू यांनी आज दिल्ली येथे शरद पवार यांच्यासोबत तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. त्यांच्यात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही पंतप्रधान पदाचा त्याग करू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या विधानापासून घुमजाव केले. तरिही काँग्रेस ऐनवेळी केंद्रात कर्नाटक पॅटर्नची पुनरावृत्ती करू शकते. त्याचबरोबर जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी काँग्रेसोबत कोणतेही मतभेद नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कर्नाटकामधील सरकार शाबूत राहून केंद्रातही त्यांना चांगली मदत मिळू शकेल.

- Advertisement -

बुवा-भतिजा २३ मे नंतर भूमिका स्पष्ट करणार

केंद्रात सत्ता स्थापन करायची असेल तर उत्तर प्रदेशचा निकाल महत्त्वाचा मानला जातो. उत्तर प्रदेशच्या इतिहासात २५ वर्षांनंतर बसपा-सपा पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला बाजूला ठेवून दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. मात्र केंद्रात कोणत्या पक्षाबरोबर जायचे, याचा निर्णय अद्याप दोन्ही पक्षांनी घेतलेला नाही. अखिलेश यादव आणि मायावती २३ मे नंतरच आपले पत्ते खोलतील.

पंतप्रधान पदाचा दावेदार कोण?

तिसऱ्या आघाडीचा नेता कोण असेल? पंतप्रधान पदाचा दावेदार कोण होईल? याची अटकळ आता बांधली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सर्व नेत्यांमध्ये ज्येष्ठ असले तरी त्यांनी आपली दावेदारी स्पष्टपणे जाहीर केलेली नाही. मात्र त्यांनी ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले होते. जर भाजपप्रणीत आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर तिसरी आघाडी आपली ताकद दाखवू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -