नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. तत्पूर्वी, चांद्रयान-3ने शनिवारी (19 ऑगस्ट 2023) चंद्राची काही छायाचित्रे टिपली आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी सकाळी सोशल मीडियावरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत.
Chandrayaan-3 Mission:
Here are the images of
Lunar far side area
captured by the
Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC).This camera that assists in locating a safe landing area — without boulders or deep trenches — during the descent is developed by ISRO… pic.twitter.com/rwWhrNFhHB
— ISRO (@isro) August 21, 2023
भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 इतिहास रचण्यापासून काही पावले दूर आहे. काही तासांत चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची तयारी इस्रो करत आहे. 23 ऑगस्ट रोजी सूर्याच्या पहिल्या किरणासह, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याआधी या यानाने चंद्राची काही अनोखी छायाचित्रे टिपली आहेत. एलएचडीए कॅमेऱ्याने टिपलेली ही छायाचित्रे असून त्यात चंद्राचा सुदूर भाग दिसत आहे. एसएसीमध्ये (Space Applications Centre) विकसित केलेला हा कॅमेरा असून याद्वारे यानाला उतरण्यासाठी जिथे खडकाळ किंवा खोल दरीचा भाग नसेल, असे सुरक्षित ठिकाण शोधण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयान-3’चे 14 जुलै 2023 रोजी दुपारी यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपण झाले. त्यानंतर यशस्वीपणे मार्गक्रमण करत या यानाने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू केली. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच चांद्रयान-3ने चंद्राचे काही फोटो घेतले आहेत, जे इस्रोच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आले होते. त्यापाठोपाठ चांद्रयान-3च्या लँडर इमेजर (LI) कॅमेऱ्याने पृथ्वीचा फोटो पाठवला होता. आता 19 ऑगस्ट रोजी या यानाने पुन्हा एकदा चंद्राचे फोटो पाठविले आहेत.
अनेक टप्पे पूर्ण केले
चांद्रयानाने प्रक्षेपण केल्यापासून अनेक मोठे टप्पे पूर्ण केले आहेत. या वाहनाने यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करून मोठा टप्पा पूर्ण केला होता. यानंतर त्याने 5 कक्षांमध्ये प्रवेश केला. यानंतर, 17 ऑगस्ट रोजी, लँडर आणि रोव्हर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले.
ही आहे संपूर्ण टाइमलाइन
-
- इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित केले आणि ते पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सोडले.
- 15 जुलै रोजी, इस्रोने पृथ्वीच्या दिशेने अंतराळ यानाला पुढे नेण्यासाठी पहिली प्रक्रिया (अर्थबाउंड फायरिंग-1) पूर्ण केली.
- 1 ऑगस्ट रोजी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेकडे वळले.
- ५ ऑगस्ट रोजी या यानाने चंद्राच्या पहिल्या 40 हजार किमीच्या कक्षेत प्रवेश केला.
- 6 ऑगस्ट रोजी यान दुसऱ्या 20 हजार किमीच्या कक्षेत पोहोचले.
- 9 ऑगस्टला यानानं तिसरी कक्षा बदलली आणि ५ हजार किमीच्या कक्षेत प्रस्थापित झालं आणि त्यानंतर 14 ऑगस्टला 1 हजार किमीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
- 16 ऑगस्ट रोजी कक्षा बदलून, ते चंद्राच्या सर्वात जवळच्या 100 किमीच्या कक्षेत स्थापित केले गेले.
- 17 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले. लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकत आहे.
- 18 ऑगस्ट रोजी, विक्रम लँडर डीबूस्टिंग प्रक्रियेतून गेला, जो यशस्वी झाला.
- 20 ऑगस्ट रोजी, लँडरने दुसऱ्यांदा डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आणि चंद्राच्या अगदी जवळ पोहोचला.
- विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.