नवी दिल्ली : भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3’ मोहीम सातत्याने प्रगती करत आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले आहे. चांद्रयानच्या लँडर इमेजर (LI) कॅमेऱ्याने पृथ्वीचा फोटो पाठवला असल्याची माहिती इस्रोने आज, गुरुवारी दिली.
Chandrayaan-3 Misson | Earth viewed by Lander Imager (LI) Camera on the day of the launch & Moon imaged by Lander Horizontal Velocity Camera (LHVC) a day after the Lunar Orbit Insertion: ISRO pic.twitter.com/CqMOKqywZP
— ANI (@ANI) August 10, 2023
चंद्राच्या तिसर्या कक्षेत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांद्रयान-3 ने लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी (LHVC) कॅमेऱ्यातून हा फोटो टिपला. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात आले होते. तेव्हापासून चांद्रयान-3 निर्धारितपणे एकामागून एक टप्पे पार करत आहे. त्याने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या नेमणुकांमध्ये बदल, अशी असेल आयुक्त ठरवणाऱ्या समितीची रचना
चांद्रयान-3 चंद्रापासून किती अंतरावर
चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचले आहे. आज चांद्रयान-3 ची कक्षा 174 किमी x 1437 किमी इतकी राहिली आहे, असे इस्रोने बुधवारी (9 ऑगस्ट) एका ट्वीटमध्ये सांगितले होते. पुढील ऑपरेशन 14 ऑगस्ट 2023 रोजी 11:30 ते 12:30 दरम्यान होणार आहे, असेही इस्रोने म्हटले होते. आता 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल. तसेच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश असेल.
याआधीही चंद्राची टिपली इमेज
शनिवारी (5 ऑगस्ट 2023) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर चांद्रयान-3ने चंद्राचे काही फोटो घेतले, जे इस्रोच्या ट्विटर पेजवरून प्रसारित करण्यात आले होते.
आतापर्यंत असा होता चांद्रयान-3चा प्रवास
- 14 जुलैला चांद्रयान-3, 170 किमी ते 36500 किमी परिघात सोडले होते.
- अंडाकृती फिरत ते चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत होते.
- 15 जुलैला चांद्रयान-3ने परिघ वाढवून 41762 किमी ते 173 किमी केले
- 17 जुलैला दुसऱ्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि 41603 किमी ते 226 किमी करण्यात आला.
- 18 जुलैला तिसऱ्यांदा परिघ वाढवून 51400 किमी ते 228 किमी करण्यात आला
- 20 जुलै रोजी चौथ्यांदा परिघ वाढवून 71351 किमी ते 233 किमी इतका झाला.
- 25 जुलैला पाचव्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि 1,27603 किमी ते 236 किमी करण्यात आला
- 31 जुलै आणि 1 ऑगस्टला मध्यरात्री पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात चंद्राकडे प्रस्थान केले.
- 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.