Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचं लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्रोने म्हटले आहे. परंतु उद्या लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास काही अडथळा आल्यास पुढील प्रक्रिया काय असणार याबाबत इस्त्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे. (Chandrayaan 3 will land on the moon on this day if there is an obstacle on August 23 Scientists explained the process of landing)
इस्रोच्या अहमदाबाद स्थित Space application सेंटरचे संचालक नीलेश एम देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान-3 मिशन 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यापूर्वी 2 तास आधी लँडर उतरवायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यांनी सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवण्यापूर्वी त्याच्या मॉड्यूलचे आरोग्य, टेलीमेट्री डेटा आणि त्यावेळी चंद्राची स्थिती यावर आधारित निर्णय घेतला जाईल.
निलेश एम देसाई म्हणाले की, चांद्रयान-3 लँडिंगच्या वेळी जर काही अडथळा आला किंवा लँडिंगसाठी अनुकूल वातावरण नसेल तर, लँडिंगची वेळ पुढे ढकलण्यात येईल आणि 27 ऑगस्ट रोजी नियोजित केली जाईल. मात्र कोणतीही अडथळा न आल्यास लँडर 23 ऑगस्टलाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल, अशी माहिती देताना नीलेश एम देसाई म्हणाले की, जर चांद्रयान-3 चे लँडिंग 23 ऑगस्टपासून पुढे ढकलून 27 ऑगस्ट रोजी करण्याचा निर्णय झाल्यास लँडर आधी निश्चित केलेल्या जागेपासून सुमारे 450 किमी अंतरावर नवीन ठिकाणी उतरवले जाईल.
इंजिन थ्रस्टर फायरचा वेग कमी करण्यासाठी मॉड्यूलमध्ये 4 थ्रस्टर इंजिन
नीलेश एम देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किमी उंचीवरून लँडिंग सुरू केल्यानंतर लँडर मॉड्यूलचा लँडिंग वेग 1.68 किमी प्रती सेकंद असणार आहे. हा वेग अतिशय वेगवान मानला जातो. तसेच चंद्राचे गुरुत्वाकर्षण देखील लँडरला खाली खेचेल. यामुळे लँडरच्या थ्रस्टर्सना रेट्रो-फायर होईल (वाहनाला त्याच्या गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने ढकलण्यासाठी). त्यामुळे त्याचा वेग आणखी कमी होत जाईल. जसजसे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकेल, तसतसे इंजिन थ्रस्टर फायरचा वेग हळूहळू खाली स्पर्श करेपर्यंत जवळजवळ शून्यावर आणेल. यासाठी लँडर मॉड्यूलमध्ये 4 थ्रस्टर इंजिन बसवण्यात आले आहेत, अशी माहीती नीलेश एस देसाई यांनी दिली.
हेही वाचा – You Tube वरुन शिकले बनावट आधार-पॅनकार्ड बनवणे; फसवणूक करणारी टोळी गजाआड
लँडिंग मॉड्युल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची प्रक्रिया
- पहिल्या टप्प्यात लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून असलेले 30 किमीचे अंतर 7.5 किमीपर्यंत कमी केले जाईल.
- दुसऱ्या टप्प्यात लँडरचे चंद्राच्या भूपृष्ठापासूनचे अंतर 6.8 किमीपर्यंत आणले जाईल. या टप्प्यापर्यंत चांद्रयान-3चा वेग 350 मीटर प्रती सेकंद म्हणजेच सुरुवातीच्या तुलनेत साडेचार पट कमी असेल.
- तिसऱ्या टप्प्यात लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 800 मीटर उंचीवर आणले जाईल. त्यानंतर दोन थ्रस्टर इंजिन टेक ऑफ करतील. या टप्प्यात लँडरचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या अगदी जवळ पोहोचेल.
- चौथ्या टप्प्यात लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या 150 मीटर इतके जवळ आणले जाईल. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात, म्हणजे व्हर्टिकल लँडिंग करण्यात येईल.
- पाचव्या टप्प्यात लँडरमधील ऑनबोर्ड सेन्सर्स आणि कॅमेर्यांचे थेट इनपुट आधीपासूनच संग्रहित संदर्भ डेटाशी जोडले जातील. या डेटामध्ये 3,900 छायाचित्रे देखील समाविष्ट आहेत. जी लँडरच्या लँडिंग साइटची आहेत. या तुलनेवरून लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर थेट लँडिंग योग्य होईल की नाही हे ठरवले जाईल. लँडिंग साइट अनुकूल नसेल तर, लँडर थोडेसे उजवीकडे किंवा डावीकडे वळेल. या टप्प्यात, चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाच्या 60 मीटरच्या जवळ आणले जाईल.
- सहाव्या टप्प्यात लँडिंगचा हा शेवटचा टप्पा आहे. ज्यामध्ये लँडर थेट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल.
हेही वाचा – मतदारांना पुन्हा हवे आहेत पंतप्रधान म्हणून मोदीच; वाचा- कोणत्या सर्व्हेतून आली माहिती समोर
यशस्वी लँडिंगनंतर रोव्हर प्रज्ञान चंद्रावर उतरले
रोव्हर प्रज्ञान विक्रमच्या आत ठेवण्यात आले आहे. यशस्वी लँडिंगनंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल, अशी माहिती नीलेश एम देसाई यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अल्फा पार्टिकल एक्सिटेशन स्पेक्ट्रोमीटर (APES) आणि लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी (LIPSE) ही दोन प्रमुख साधने आहेत. या दोघांचे काम आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावरील गोष्टींचे मोजमाप करणे, खनिजे आणि पदार्थांची माहिती देणे हे काम असणार आहे.
लँडर विक्रममध्ये 4 प्रमुख उपकरणे
नीलेश एम देसाई म्हणाले की, लँडर विक्रममध्ये 4 प्रमुख उपकरणे असून यामध्ये रेट्रोरिफ्लेक्टरचा समावेश करण्यात आला आहे. जे चंद्रापासून पृथ्वीपर्यंतचे कार्य करेल. सिस्मोग्राफ हे दुसरे उपकरण भूगर्भीय प्रक्रिया समजण्यास मदत होईल. रंभा उपकरण वातावरणातील प्लाझ्माची घनता मोजेल. चौथे उपकरण चंद्र पृष्ठभाग थर्मोफिजिकल प्रयोग, वरच्या पृष्ठभागावरील आवरण रेगोलिथची थर्मल चालकता मोजेल.
मिशनला मोठे यश मिळेल असा के सिवन यांना विश्वास
चांद्रयान-2 मोहिमेचे प्रभारी असलेले इस्रोचे माजी अध्यक्ष के सिवन यांनी दावा केला की, भारताची चांद्रयान-3 मोहीम खूप यशस्वी होईल. ते म्हणाले की, हा काळ अत्यंत त्रासदायक असला तरी यावेळी मोठे यश मिळेल अशी आशा आहे. रशियाच्या लुना 25 मोहिमेच्या अपयशावर बोलताना ते म्हणाले की, याचा परिणाम चांद्रयान-3वर होणार नाही. कारण भारताकडे तंत्रज्ञान आणि प्रणाली आहेत. ज्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय चांद्रयान-3चे सॉफ्ट लँडिंग करता येईल.