घरदेश-विदेशस्वस्ताई आणि ‘अच्छे दिन’ हे आजही जनतेसाठी स्वप्नच, ठाकरे गटाची भाजपावर कडाडून...

स्वस्ताई आणि ‘अच्छे दिन’ हे आजही जनतेसाठी स्वप्नच, ठाकरे गटाची भाजपावर कडाडून टीका

Subscribe

मुंबई : सन 2014मध्ये ‘महंगाई डायन’च्या नावाने आधीच्या यूपीए सरकारच्या नावाने शिमगा करणारेच मागील नऊ वर्षे सत्तेत आहेत. तरीही महंगाई डायन सर्वसामान्यांच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. ‘स्वस्ताई’ची स्वप्ने दाखविणाऱ्या ‘सौदागरां’ना केंद्रात सलग दोनदा बहुमताने जनतेने सत्तेत बसविले, पण स्वस्ताई आणि ‘अच्छे दिन’ हे आजही जनतेसाठी स्वप्नच आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाने भाजपावर केला आहे.

हेही वाचा – निवडणुकीपूर्वी जनतेच्या भावनांना हात घालायचा आणि… ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

बुधवारी भाऊबीज उत्साहात पार पडली आणि ‘महागाई वाढणार’ असे सांगत केंद्र सरकारने दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानेच महागाई वाढण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे 0.52 टक्के होता. सलग सातव्या महिन्यांत हा दर शून्याच्या खाली आला आहे. त्यात भाजीपाल्याच्या किमतीतील चढ-उतार, खाद्यपदार्थांची दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी यामुळे नजीकच्या भविष्यात घाऊक महागाई वाढू शकते, असे नेहमीचे इशारे-नगारे सरकारने वाजविले आहेत. घाऊक महागाई वाढली तर किरकोळ महागाईही वाढणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी दरवाढीला तोंड देण्याची तयारी सामान्य जनतेला ठेवावी लागेल, असा काळजीचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून दिला आहे.

हेही वाचा – गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे, आनंदाचा शिधावरून सुप्रिया सुळेंचा शासनावर निशाणा

- Advertisement -

भाजीपाल्यापासून धान्य-कडधान्यापर्यंत, डाळींपासून खाद्यतेलापर्यंत, जीवनावश्यक बाबींपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत फक्त दरवाढच होत आहे. याच वातावरणात दिवाळी आली आणि गेली. महागाईकडे दुर्लक्ष करीत, ‘उसने अवसान’ आणत जनतेने दिवाळी साजरी केली. मात्र आता दिवाळी संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेचा ‘अवसानघात’ केलाच. महागाई वाढणार असा इशारा दिला आणि आपले हात झटकले असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.

सरकारी उद्योगांची विक्री असो, सरकार बँकांचे खासगीकरण असो की महागाईचे खापर, स्वतःची जबाबदारी झटकण्याचेच उद्योग केंद्रातील राज्यकर्त्यांकडून सुरू आहेत. त्यामुळेच ‘महागाई वाढेल’ या सरकारच्या नवीन इशाऱ्याबाबतही ‘त्यात विशेष काय?’ असाच प्रश्न सामान्यांना पडला आहे, अशी कोपरखळीही ठाकरे गटाने लगावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -