नवी दिल्ली : 98 व्या मराठी साहित्य संमेलनाला नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे. दिल्लीतील विज्ञान भवन सभागृहात आज शुक्रवारी (ता. 21 फेब्रुवारी) संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष ठिकाणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचा गौरव केला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मी मराठीशी जोडलो असून मी मराठीतील अनेक शब्द शिकण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान मोदींनी यावेळी सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या छावा चित्रपटाचा उल्लेख केला. (Chhaava mentioned by PM Narendra Modi in 98th Marathi Sahitya Sammelan)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्णण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल याने छत्रपती संभाजी मराजांची महाराजांची भूमिका साकारलेल्या छावा चित्रपटाचा उल्लेख करत म्हटले की, महाराष्ट्राने नेहमीच नवे विचार आणि प्रतिभांना आमंत्रित केले. त्यामुळे महाराष्ट्राने किती प्रगती केली आहे, हे आपल्याला माहीत आहे. आपली मुंबई केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपास आली आहे. जेव्हा मुंबईचा उल्लेख होतो तेव्हा चित्रपटांशिवाय ना साहित्य विषय पूर्ण होणार ना मुंबईचा. हा महाराष्ट्र आणि मुंबईच आहे, ज्यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सध्या तर छावाची धूम सुरू आहे, असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.
हेही वाचा… PM Modi : मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो, साहित्य संमेलनात मोदींचे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या भाषणातून छावा चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी आणि सर्वांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यासोबतच जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले की, संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय हा आपल्याला शिवाजी सावंत यांच्या लिखाणामुळे झाल्याचे यावेळी मोदींकडून सांगण्यात आले. परंतु, मोदींनी छावा चित्रपटाचा उल्लेख केल्याने विज्ञान भवनात उपस्थितांकडून जल्लोष करण्यात आला.