घरताज्या घडामोडीछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस, पाच वाहनांची केली जाळपोळ

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस, पाच वाहनांची केली जाळपोळ

Subscribe

वॉटर प्लांटचे काम थांबवण्याची दिली धमकी

छत्तीसगढमधील बीजापुर जिल्ह्यात वॉटर फिल्टर प्लांटच्या बांधकामात वापरण्यात येत असलेल्या पाच वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे. या वाहनांमध्ये ४ मशीन आणि एका वाहनाचा समावेश आहे. नेमेड पोलीस स्टेशनच्या भागात ही घटना घडली आहे. छत्तीसगढमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. चकमकीदरम्यान एका कोब्रा जवानाला नक्षलवाद्यांनी घटनस्थळावरुन अपहरण करुन बंदी बनवले होते. या जवानाची सुखरुप सुटका करण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे.

बीजापूर जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी मिंगाल नदीच्या काटावर वॉटर प्लांट उभारण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रायपुरपासून ४५० किलोमीटर अंतरापासून लांब असलेल्या मिंगाचल नदीपाशी काही नक्षली आले, वाहने आणि बांधकाम करणाऱ्यांना वॉटर प्लांटचे काम थांबवण्याची धमकी देऊ लागले. यानंतर त्यांनी कॉंक्रीट एकजीव करण्याची मशीन, दोन सीमेंट मिसळण्याच्या मशीन आणि एका ट्रॅक्टरला आग लावली आणि घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

याच भागात गेल्या आठवड्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत २० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. तसेच काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. छत्तीसगढ,बीजापूर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट झाले आहे. गडचिरोली,गोंदियाच्या नक्षल भागात पोलिसांकडून काँबिंग ऑपरेशन राबविलेले आहेत. सीमाभागात नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांचा वॉच आहे. इंटेलिजेन्समार्फत नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजरही ठेवण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -