कुंभमेळ्यात यापुढे राम – श्यामची ‘जुदाई’ नाही!

यंदाच्या वर्षीपासून कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ वर्षांखालील प्रत्येक मुलाला 'आरएफआयडी टॅग' लावण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली आहे.

kumbh mela
फाईल फोटो

‘कुंभ के मेले में राम और श्याम दो भाई बिछड गये’… हे वाक्य आपण आजवर अनेकदा ऐकलं आहे. अनेक जुन्या हिंदी चित्रपटांनीदेखील कुंभमेळ्यात बिछडलेल्या आणि काही वर्षांनी पुन्हा भेटलेल्या ‘राम – श्याम’ ची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखवली आहे. इतकंच नाही तर दरवर्षी भरणाऱ्या या कुंभमेळ्यात लहान मुलांची, मित्रांची किंवा कुटुंबियांची एकमेकांसोबत ताटातूट झाल्याचे अनेक किस्सेही आजवर समोर आले आहेत. मात्र, आता यापुढे कुंभमेळ्यात ‘राम-श्याम’ कधीच बिछडणार नाहीत. याचं कारण म्हणजे यावर्षीपासून कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या सर्व १४ वर्षांखालील मुलांना ‘आरएफआयडी’ अर्थात रेडिओ फ्रिक्वेंसी ओळख टॅग लावण्यात येणार आहे. त्यामुळे एखादे लहान मूल मेळ्याच्या गर्दीत हरवल्यास रेडिओ फ्रिक्वेंसी टॅगच्या माध्यमातून पोलिसांना त्याचा त्वरित शोध घेता येणार आहे. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या कुंभमेळ्यामध्ये १४ वर्षांखालील एखादं मुल हरवल्यास, त्याला ‘आरएफआयडी’च्या माध्यमातून चटकन शोधून काढता येईल.


पाहा : अक्षय कुमारची मुलीसोबत पतंगबाजी

उपलब्ध आकडेवारीनुसार, कुंभमेळ्यामध्ये पुढील ५० दिवसांमध्ये सुमारे १२ कोटी लोक येण्याची शक्यता आहे. यामध्ये १४ वर्षांखालील बालकांची संख्याही जास्त असते. अनेकदा ही मुलं मेळ्याच्या गर्दीत हरवकाक आणि एवढ्या महाकाय गर्दीत त्यांना शोधणंही कठीण होऊन जातं. तसंच वय लहान असल्यामुळे हरवलेल्या मुलांनाही आपल्या पालकांचा शोध घेणं तितकसं शक्य होत नाही. त्यामुळेच यंदाच्या वर्षीपासून १४ वर्षांखालील प्रत्येक मुलाला त्याच्या सुरक्षिततेसाठी आरएफआयडी टॅग लावण्यात येणार असल्याची माहिती,  राज्याचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली आहे. या रेडिओ फ्रीक्वेंसी टॅगच्या प्रणालीसाठी व्होडाफोन कंपनीचे सहकार्य मिळाले असून, असे एकूण ४० हजार टॅग्स तयार करण्यात आल्याचंही सिंह यांनी सांगितले आहे.

‘आरएफआयडी’ म्हणजे नक्की काय? 

ही एक वायरलेस प्रणाली आहे. याच्या माध्यमातून इलेक्ट्रो-मॅग्नेटिक स्प्रेक्ट्रमची रेडियो फ्रिक्वेंसी असलेल्या भागात विद्युत चुंबक किंवा इलेक्ट्रोस्टेटिक कपलिंगचा वापर करुन, हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातो. हरवलेल्या व्यक्तीच्या शरीरावर आरएफआयडीचा टॅग असेल, तर रेडिओ फ्रिक्वेंसी लगेचच त्या व्यक्तीचं लोकेशन ट्रेस करते ज्यावरुन ती व्यक्ती नेमकी कुठे आहे याची माहिती मिळते. या सुविधेमुळे कुंभ मेळ्यात येणाऱ्या लोकांना, विशेषत: ज्यांच्यासोबत लहान मुलं आहेत, अशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. मेळ्यात हरवणाऱ्या मुलांना शोधण्यासाठी आमची ‘आरएफआयडी’ टॅग प्रणाली सक्षमपणे तयार आहे, असा विश्वास पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे आता इथून पुढे कुंभमेळ्यात बिछडणाऱ्या ‘राम – श्याम’च्या गोष्टींना पूर्णविराम लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.