करोना व्हायरसमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त

Today's Petrol & diesel prices
पेट्रोल, डिझेल

अल्पावधीतच चीनमध्ये हाहाकार उडवणाऱा करोना व्हायरस भारतात पोहचला असून मुंबईत ३ जणांना याची लागण झाली आहे. यामुळे केंद्र सरकारसह राज्य सरकारने आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण दुसरीकडे करोना व्हायरसमुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या असून येत्या काही दिवसात त्यात अजून घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीन हा कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करणारा जगातील एकमेव देश आहे. पण सध्या करोना व्हायरसमुळे चीनमधील सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प आहे. यामुळे चीनमधून कच्च्या तेलाची मागणी घटली आहे. चीनसारख्या देशातून कच्च्या तेलाची मागणी घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. याचा परिणाम भारतातील इंधनाच्या किंमतीवरही झाला आहे. जर हीच परिस्थिती अजून काही दिवस राहीली तर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत अजून घट होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एन्जल ब्रोकींगचे उप आयुक्त अनुज गुप्ता यांनी याबद्दल बोलताना सांगितले की अमेरिका आणि चीन यांच्यातील तेल करारावरील हस्ताक्षरानंतर चीनकडून तेलाची मागणी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे यावर पाणी फिरले आहे. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये लोकांनी घराबाहेर पडणेच बंद केले आहे. यामुळे वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे चीनमध्ये बराचसा कच्च्या तेलाचा साठा पडून आहे.

परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी घटल्याने भारतासह अनेक देशात तेलाच्या किंमती घटल्या आहेत. ११ जानेवारी नंतर पेट्रॉल १.८५ पैसे प्रती लीटर स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीत ग्राहकांना प्रती लीटरमागे १.८६ पैसे दिलासा मिळाला आहे. शनिवारी पेट्रोलच्या किंमती दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत २७ पैसे तर चेन्नईत २८ पेसे प्रती लीटर कमी झाल्याची नोंद करण्यात आली.

तर डिझेलच्या किंमती दिल्ली, कोलकातामध्ये ३० पैसे तर मुंबई आणि चेन्नईत ३२ पैसे प्रती लीटरने कमी झाल्या आहेत. चालू महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक दिवसाच्या आत एवढ्या फरकाने घट झाली आहे. इंडीयन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, कोलकाता मुंबई आणि चैन्नईत पेट्रोलच्या किंमती 74.16 रुपये, 76.77 रुपये, 79.76 रुपये आणि 77.03 रुपये प्रती लीटर झाली आहे. तर चार महानगरात डिझेलचा भाव कमी होऊन 67.31 रुपये, 69.67 रुपये, 70.56 रुपये आणि 71.11 रुपयावर पोहचला आहे.