कोरोना व्हायरसचे पाप चीनचं; WHO देखील यात सहभागी – चीनी वैज्ञानिकाचा दावा

Li-Meng Yan - Chinese virologist
विषाणूशास्त्रज्ञा (Virologist) ली मेंग-यान (Li Meng-Yan)

कोरोना व्हायरसच्या मरामारीमुळे संपुर्ण जग लॉकडाऊनच्या गर्तेत सापडले असून अनेक देशांची अर्थव्यवस्था रसातराळा गेली आहे. २०२० सुरुवातीपासूनच अनेक देश कोरोना व्हायरसमुळे हैराण झाले आहेत. यात हा व्हायरस नेमका आला कुठून? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले गेले. मात्र कुणीही निष्कर्षापर्यंत आले नाही. आता मुळच्या चीनच्या असलेल्या विषाणूशास्त्रज्ञा (Virologist) ली मेंग-यान (Li Meng-Yan) यांनी दावा केला आहे की, हा व्हायरस वुहानच्याच सरकारी प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला. चीन सरकारला याबाबत पक्की माहिती होती. मात्र चीनची राजधानी बिजींगमधून ही गोष्ट दाबली गेली. चीनच्या या पापात जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील सहभागी असल्याचा संशय या वैज्ञानिकाने व्यक्त केला आहे. WION या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ली मेंग-यान यांनी सांगितले की, त्या सुरुवातीच्या दिवसात वुहान येथे या व्हायरसच्या उत्पत्तीबाबत काम करत होत्या. कोरोना व्हायरस वुहानच्या मटण मार्केटमधून पसरला असल्याचा खोटा दावा चीनच्या सरकारने केलेला आहे. जगाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी चीनच्या सरकारने हा दावा केला होता. ली मेंग-यान यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्या अमेरिकाला पळून गेल्या आहेत. कोरोना व्हायरसची उत्पत्ती ही वुहानच्या प्रयोगशाळेतच झाली, हे सिद्ध करण्यासाठी त्या पुरावे गोळा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेत Li-Meng Yan यांनी वैज्ञानिक म्हणून काम केलेले आहे. चीन सरकारने आपली प्रतिमा डागाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचेही ली मेंग-यान यांनी सांगितले. याआधी १४ सप्टेंबर रोजी देखील त्यांनी हाच आरोप पहिल्यांदा केला होता.

WHO च्या भूमिकेबाबत बोलताना ली मेंग-यान म्हणाल्या की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत जेव्हा जगाला कळले तेव्हा WHO ने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच चीनच्या सरकारच्या इशाऱ्यावरच हा व्हायरस तयार केला असून त्यावर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्वांचे तोंड बंद केले आहे. चीनमधील डॉक्टारांना याची कल्पना होती, मात्र त्यांना या विषयावर गप्प राहण्यास सांगितले गेले, असा दावा ली मेंग-यान यांनी केला.