शी जिनपिंग आणखी पॉवरफुल! तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर

चीनसाठी पुढील ५ वर्षांत देश-विदेशातील आव्हानांमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

Xi Jinping Third Time President: नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या १४ व्या बैठकीत शुक्रवारी चीनच्या संसदेत शी जिनपिंग यांना अध्यक्ष म्हणून अभूतपूर्व तिसरा कार्यकाळ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. शी जिनपिंग पुढील ५ वर्षांसाठी तिसऱ्यांदा ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील. चीनसाठी पुढील ५ वर्षांत देश-विदेशातील आव्हानांमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. आपल्या पहिल्या दोन टर्ममध्ये त्यांनी चीन सरकार आणि अर्थव्यवस्थेवर मजबूत पकड ठेवली आहे.

१४ व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या चालू अधिवेशनात शी जिनपिंग यांची एकमताने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे अध्यक्ष आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, NPC बैठकीत शी जिनपिंग यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे चीनमधील त्यांची ताकद आणखी मजबूत होणार आहे. यामुळे ते चीनमध्ये सर्वाधिक काळ सेवा करणारे राष्ट्रप्रमुख बनले आहेत. याचा अर्थ शी त्यांच्या वयाच्या सातव्या दशकात राज्य करतील. जर कोणतेही आव्हान उभे राहिले नाही तर त्यांचा कार्यकाळ आणखी दीर्घकाळ टिकेल, असं देखील सांगण्यात येतंय.

दरम्यान, NPC चीनच्या संसदेने ५ मार्च रोजी वार्षिक बैठक सुरू केली होती. आठवडाभरापासून ही बैठक सुरू आहे. यामध्ये ६९ वर्षीय शी यांना काही आव्हानांचाही सामना करावा लागला आहे. कोरोना संसर्गासंदर्भात बनवलेल्या जीरो-कोविड पॉलिसीमुळे चीन देखील स्कॅनरच्या कक्षेत येत आहे. असे असतानाही पुन्हा एकदा देशाची कमान त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.