घरट्रेंडिंग'त्यां'चं ऐकलं असतं, तर चीनमध्ये करोना पसरलाच नसता; अखेर करोनानंच घेतला त्यांचा...

‘त्यां’चं ऐकलं असतं, तर चीनमध्ये करोना पसरलाच नसता; अखेर करोनानंच घेतला त्यांचा जीव!

Subscribe

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या करोना व्हायरसमुळे अवघ्या जगाला एका मोठ्या आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं आहे. चीनच्या वुहान भागात या व्हायरसचा सर्वाधिक फैलाव झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे ३० हजार नागरिक करोना व्हायरसने ग्रस्त झाले आहेत. तर, सुमारे ६०० नागरिकांचा जगभरात करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणि मृतांमध्ये अशी एक व्यक्ती आहे, जिनं सर्वात पहिल्यांदा या व्हायरसबद्दल बोलायचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि आज चीन भीषण अशा आरोग्य आणीबाणीच्या तोंडाशी सापडला आहे! या व्यक्तीचं नाव आहे डॉ. ली वेनलियांग.

डिसेंबरमध्ये दिला होता इशारा

३४ वर्षीय वेनलियांग यांनी सर्वात आधी डिसेंबर २०१९च्या शेवटच्या आठवड्यामध्ये अशा प्रकारच्या धोक्याची पूर्वसूचना देण्याचा प्रयत्न केला होता. तिथल्या स्थानिक प्रशासनाला देखील त्यांनी सतर्क करण्याचा प्रयत्न केला होता. ते काम करत असलेल्या वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या काही रुग्णांमध्ये त्यांना या व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तो वेगाने पसरत असल्याचं देखील त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे काळजीपोटी त्यांनी या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी काय करायला हवं, याचा सल्ला देणारा एक संदेश मोबाईलवरून व्हायरल केला. पण त्याकडे गांभीर्याने पाहायचं सोडून स्थानिक पोलिसांनी उलट त्यांनाच ‘अफवा पसरवू नका’, असं सांगत दम भरला. अखेर व्हायचं तेच झालं.

- Advertisement -

करोनानंच घेतला बळी

वेनलियांग यांची भिती अवघ्या काही दिवसांमध्येच खरी ठरली. वुहानमध्ये वेगाने हा व्हायरस पसरला. चीनमध्ये आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. पण या सगळ्यात अशा रुग्णांवर उपचार करता करता खुद्द वेनलियांग यांनाच करोना व्हायरसची लागण झाली. त्यांना त्याच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण त्यांचा लढा अपयशी ठरला आणि तिथेच त्यांचं निधन झालं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना हिरो म्हणून आता गौरवलं जात आहे. थेट जागतिक आरोग्य परिषदेने वेनलियांग यांच्या मृत्यूबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये त्यांच्या निधनाला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर देखील वेनलियांग यांच्याबद्दल आदर आणि शोक व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -