मुंबई : ‘चांद्रयान-3’ चंद्रावर उतरले आणि त्या भूमीला पंतप्रधानांनी ‘शिवशक्ती’ असे नाव दिले. पण चीनने लडाख तोडला, अरुणाचलवर दावा सांगितला. भारतमातेचे लचके असे तोडले जात असताना चंद्रावरच्या जमिनीचे मोल ते काय? चंद्रावर जायचे तेव्हा जाऊ, पण आधी चीनची घुसखोरी थांबवा. 200 रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त केल्याने चीनच्या घुसखोरीचा विषय मागे पडेल असे मोदींना वाटत असेल तर, ते चूक आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.
हेहे वाचा – मुंबईतील बैठकीचा ‘तोच’ संदेश, ठाकरे गटाचा इंडिया आघाडीवरून मोदी सरकारला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक विश्वगुरू बनले आहेत. ते ब्रिक्स संमेलनासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले, पण तेथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीच सरबराई यजमान देश करीत होते व आमच्या पंतप्रधानांना फार महत्त्व मिळाले नाही, हे धक्कादायक असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तेथे भेट घेतली व चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवर नाराजी व्यक्त केली. पण मोदींची पाठ वळताच चिन्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने आपल्या देशाचा नवा नकाशा जाहीर केला. त्यात अक्साई चीनबरोबर अरुणाचल प्रदेशलाही चीनचा भाग दाखवला. चीनने लडाखची जमीन आधीच गिळंकृत केली आहे. चीन भूतानजवळ त्यांच्या वसाहती बनवत आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘गरुड झेप’ नव्हे तर, ही श्वापदांची टोळी; ठाकरे गटाच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर
त्याच चिनी राष्ट्राध्यक्षांना मोदी यांनी ‘जी-20’ संमेलनासाठी खास आमंत्रित केले व पुन्हा एकदा मोदी व जिनपिंग अहमदाबादेत झोपाळ्यावर बसून ढोकला, गाठ्या खातानाचे फोटो प्रसिद्ध होतील, पण भारताची जमीन रोज ओरबाडणाऱ्या या चिनी सैतानाला भारतात ‘जी-20’साठी बोलावू नये व आमच्या सैनिकांचा अपमान करू नये, अशी जोरदार मागणी आता उठू लागली आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
‘इंडिया’ आघाडीमुळे देशभक्तीची ठिणगी पडली आहे व भाजपाप्रमाणे हे ढोंगी देशप्रेम नाही. मणिपूर आजही धुमसते आहे. हरयाणात भाजपाच्या लोकांनी आगी लावल्या. देशभरात वणवा पेटवून त्यांना निवडणुकांना सामोरे जायचे आहे, पण ‘इंडिया’ आघाडी हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही. लोक आता मोदींना प्रश्न विचारीत आहेत. ही हिंमत ‘इंडिया’ आघाडीने निर्माण केली व ‘इंडिया’ आघाडी देशातील हुकूमशाहीला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, याचा विश्वास लोकांना वाटत आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – Narendra Modi तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान? परदेशातील भारतीयांना विश्वास, सर्वेक्षणावर भाजपा खूश
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना देशभरात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात आहे. ईडी, सीबीआयला घाबरायचे नाही व झुकायचे नाही. ‘आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. हिंमत असेल तर टाका आत,’ अशी हिंमत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखवली. हेच ‘इंडिया’ आघाडीचे यश आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.