Coronavirus: नागरी उड्डाण मंत्रालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेट करण्यात आलं आहे. तसंच नागरी उड्डाण मंत्रालयाचं राजीव गांधी भवन देखील सील करण्यात आलं आहे.

rajiv gandhi bhavan

नागरी उड्डाण मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की १५ एप्रिल रोजी कार्यालयात आलेल्या मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संक्रमित कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या सर्व सहयोगींना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेट करण्यात आलं आहे. तसंच नागरी उड्डाण मंत्रालयाचं राजीव गांधी भवन देखील सील करण्यात आलं आहे. मंत्रालयाने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. ट्विटरवर म्हटलं आहे की, “१५ एप्रिलला कार्यालयात आलेल्या मंत्रालयाचा एक कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं २१ एप्रिलला स्पष्ट झालं. सर्व आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केलं जात आहे.”

दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कोरोनाची लागण झालेला कर्मचारी लवकर बरा व्हावा, यासाठी शुभेच्छा देतो, असं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या कर्मचाऱ्या सोबत आहोत. त्याला शक्य तेवढी वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. जे लोक कर्मचार्‍याच्या संपर्कात आले होते त्यांनी आवश्यक ते सर्व मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. कर्मचारी लवकर बरा व्हावा अशा मी शुभेच्छा देतो.”


हेही वाचा – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना नेमकं झालं तरी काय?