घरCORONA UPDATE'लक्षात ठेवा, मी निर्वाचित आहे, तुम्ही नियुक्त आहात', मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनाच ठणकावलं!

‘लक्षात ठेवा, मी निर्वाचित आहे, तुम्ही नियुक्त आहात’, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनाच ठणकावलं!

Subscribe

महाराष्ट्रात भाजपकडून राज्यपालांकडे वारंवार राज्यातील महाविकासआघाडी सरकारविरोधात तक्रार केली जात असल्याचं सरकार स्थापनेपासून अनेकदा दिसून आलं आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून भाजप राज्यपाल पदाचा गैरवापर करत असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. यातून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा सामनाच महाराष्ट्रात सुरू आहे की काय? असं वाटू लागलं होतं. मात्र, आता महाराष्ट्रासारखंच काहीसं चित्र पश्चिम बंगालमध्ये दिसू लागलं आहे. आपल्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्याविरोधात जाहीर रणशिंग फुंकलं आहे!

mamata banerjee letter 1 - courtecy - BBC

- Advertisement -

मागील वर्षी जुलैमध्ये जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. मात्र, तेव्हापासूनच त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर उघडपणे टीका करायला सुरुवात केली. मूळचे भाजपचे असलेले धनखर यांनी प. बंगाल सरकारविरोधात कणखर भूमिका घेतली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पश्चिम बंगालमध्ये देखील राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद सुरु झाला.

mamata banerjee letter 2 - courtecy - BBC

- Advertisement -

धनखर यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. कधी ते त्यांच्या कामकाजावर निशाणा साधत, तर कधी सरकार राजकारण करतंय म्हणून टीका करत. ममता बॅनर्जींवर कोरोनाची आकडेवारी लपवण्याचा आरोप देखील त्यांनी केला. शिवाय राज्यातल्या जनतेचा केंद्र सरकारला पाठिंबा असून राज्याच्या कामकाजावर जनता समाधानी नाही असं देखील ते एकदा म्हणाले होते. नुकतेच त्यांनी राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाला सहकार्य न केल्याबद्दल सरकारवर आगपाखड केली होती. उलट जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला राज्यात रेड कार्पेट दिल्याचा निषेध केला होता.

अखेर ममता बॅनर्जी यांच्या धैर्याचा बांध फुटला आणि त्यांनी राज्यपालांना या सगळ्या प्रकाराबद्दल थेट पत्रच लिहिलं. शिवाय हे पत्र सोशल मीडियावर जाहीर देखील केलं! ‘मी निवडून आलेली लोकप्रतिनिधी आहे आणि तुम्ही नियुक्त करण्यात आलेले राज्यपाल आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या राज्याचे राज्यपाल आहात, त्याच सरकारवर, मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर तुम्ही वारंवार टीका करत आहात. हे असंवैधानिक आहे. तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे’, असा टीकावजा सल्ला ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. ‘तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, ते पाहाता मी तुम्हाला पाठवत असलेलं हे पत्र सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सामान्य जनता देखील जे काही चाललं आहे, त्याचा विचार करेल. तुम्ही मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकता. पण सरकारच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही’, असा दम देखील ममता बॅनर्जींनी भरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील निवडीसंदर्भात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांची ६ महिन्यांची मुदत २८ एप्रिलला संपत असून त्याआधी विधानपरिषदेवर राज्यपाल निर्वाचित सदस्य म्हणून जाण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी चालवली होती. मात्र, राज्यपाल हा नियुक्ती करणार नसल्याचं आता बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतेमंडळींनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटींच्या पार्श्वभूमीवर भाजप उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जावं म्हणून राज्यपालांसोबत मिळून राजकारण करण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -