नवी दिल्ली – बीडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आणि भाजपचा पदाधिकारी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. त्यापूर्वी सहा दिवसांपासून फरार असलेला खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत बीडमध्ये आणले जाणार आहे. खोक्यावर झालेल्या बुलडोझर कारवाईनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, खोक्या असो की बोक्या, की ठोक्या, सर्वांना ठोकणार, असे म्हणत त्यांनी राज्यात गुन्हेगारांना थारा दिला जाणार नाही असा संदेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘वेव्ह्स 2025’ या कार्यक्रमासाठी आज (गुरुवार) नवी दिल्ली येथे आले आहे. यावेळी ते माध्यमांसोबत बोलत होते.
बीड जिल्हा सध्या गुन्हेगारांच्या कारवायांनी कुप्रसिद्ध झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वच पक्षांच्या आमदारांच्या निकटवर्तीयांचे मारहाण आणि दादागिरीचे व्हिडिओ समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आवाज उठवणारे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. वनविभागानेही खोक्या भोसलेवर कारवाई केली. वनविभागाच्या ताब्यातील जमीनीवर बांधलेल्या त्याच्या घरावर वनविभागाने नोटीस बजावली. आज नोटीशीला सात दिवस झाले तरीही उत्तर आले नाही. त्यामुळे वनविभागाने थेट बुलडोझर कारवाई केली आहे.
…सर्वांना ठोकणार !
वनविभागाच्या या कारवाईनंतर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी ‘खोक्या सापडला! आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे!’ अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला, यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खोक्या असो की बोक्या, की ठोक्या, कोणालाही सोडणार नाही. सर्वांना ठोकणार. असा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे.
🕕 5.57pm | 13-3-2025📍New Delhi.
LIVE | Media Interaction#Maharashtra #NewDelhi https://t.co/H3Xsrrt3NA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 13, 2025
हेही वाचा : Khokya Bhosale : खोक्याला पकडलं उत्तर प्रदेशात अन् कारवाई देखील बुलडोझर बाबासारखीच