पवन खेरांनी मागितली माफी, राजकारणात कोणीही असभ्य भाषा वापरणार नाही; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीट

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना काल आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली होती. त्यानंतर पवन खेरा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने खेरांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. परंतु पवन खेरांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून राजकारणात आता कोणीही असभ्य भाषा वापरणार नाही, असं ट्वीट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत लिहिलंय की, राजकारणात असभ्य भाषा वापरली जाऊ नये. पवन खेरांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. सार्वजनिक ठिकाणी पावित्र्य जपले जावे, अशी आमची अपेक्षा आहे. यानंतर कोणीही राजकारणात असभ्य भाषा वापरू शकणार नाही, असं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे.

पवन खेरा यांच्या अटकेवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरुद्ध आक्रमक झाल्यानं दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा घडला. पवन खेरा यांच्याविरुद्ध तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने पवन खेरा यांना दिलासा देताना तीन गुन्हा एकत्र करण्याचे आदेश दिले. मात्र, या गुन्ह्यांवर कोणत्या न्यायालयात सुनावणी होणार हे निश्चित झालेलं नाही. पवन खेरांनी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

नेमकं प्रकरण काय?

पवन खेरा यांनी अदाणींच्या मुद्द्यावरून एक पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेतच पवन खेरांनी मोदींवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नरेंद्र गौतम दास मोदी असा केला होता. याच विधानावरून पवन खेरा यांच्याविरुद्ध आसाम, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पवन खेरा यांना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला असून आता 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.


हेही वाचा : पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला, ६ पोलीस जखमी