ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील लसीकरणासंदर्भात चर्चा

Mamata Banerjee meets Prime Minister Narendra Modi, after pm meeting Mamata Banerjee said vaccine stock
ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान निवासमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून सोमावारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मंगळवार सकाळपासूनच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय मंडळींसोबत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर, काँग्रेस नेते कमलनाथ यांची भेट आणि चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर ममता बॅनर्जी प्रथमच दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दुसऱ्यांदा भेटत आहेत. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भेटीबाबत माहिती दिली आहे.

पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. पंतप्रधान मोदी कलाईकुंडा येथे आले होते परंतू त्यांच्यासोबत व्यक्तीगत भेट झाली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालला लोकसंख्येनुसार लसींचा कमी साठा मिळत असल्याचे सांगितले यावर पंतप्रधानांनी या विषयावर लक्ष घालू असे उत्तर दिलं असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता

ममता बॅनर्जी बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शऱद पवार यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना ममता बॅनर्जी त्यांच्या घरी जाऊन भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जींच्या निवासस्थानी भेटीला येणार आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींवर देशाचं लक्ष आहे.