(Coconut Oil) नवी दिल्ली : खोबरेल तेल खाद्यतेल म्हणून वापरावे की, शरीराला तसेच डोक्याला लावण्यासाठी वापरावे, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आला होता. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने यावर युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल दिला. तेलाच्या पॅकिंवर जे नमूद केले असेल, त्यानुसार उत्पादन शुल्क आकारणी केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (Supreme Court decision regarding coconut oil)
शुद्ध खोबरेल तेल कोणत्या श्रेणीत ठेवावे, असा प्रश्न न्यायालयासमोर होता. यासंदर्भात तत्कालीन सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या खंडपीठाने परस्परविरोधी निर्णय दिला होता. लहान पॅकिंगमधील खोबरेल तेल खाद्यतेल म्हणून वर्गीकृत करणे योग्य ठरेल, असे मत सरन्यायाधीश गोगोई यांनी मांडले होते. सरन्यायाधीश गोगोई हे 2019 रोजी निवृत्त झाले. तर, त्यांच्याबरोबरचे न्यायमूर्ती भानुमती यांचे म्हणणे होते की, लहान कंटेनरमध्ये पॅक केलेले खोबरेल तेल हे केसांचे तेल म्हणून वर्गीकृत केले पाहिजे, असे टाइम्स ऑफ इंडियाने एका वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा – SS UBT Vs Modi-Shah : …त्याचा राग भाजपा डॉ. आंबेडकरांवर काढत आहे, ठाकरे गटाचा दावा
सध्या देशाच्या विविध भागांत खोबरेल तेलाचा दुहेरी वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्या आपले तेल कशाप्रकारचे ब्रँडिंग करून विकतील, त्यानुसारच वर्गीकरण करून त्यावर त्यावर अन्न सुरक्षा नियम किंवा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स एक्टच्याअंतर्गत कर वसूल केला जाईल, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने स्पष्ट केले.
शुद्ध खोबरेल तेल नेहमीच केसांचे तेल मानले जावे, असा युक्तिवाद महसूल विभागाने या प्रकरणात केला होता. तथापि, एखादी व्यक्ती आर्थिक कारणांमुळे किंवा आरोग्याच्या कारणास्तव किंवा अन्न तयार करताना ताजे तेल वापरण्याच्या हेतूने कमी प्रमाणात तेल खरेदी करू शकतो. तेलाचे लहान आकाराचे पॅकिंग असल्यास त्याचा वापर केसांचे तेल म्हणूनच केला पाहिजे, असा अर्थ लावता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मॅरिको आणि बजाज कंझ्युमर यासारख्या एफएमसीजी कंपन्यांसह ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Coconut Oil: Supreme Court decision regarding coconut oil )
हेही वाचा – SS UBT about Ambedkar : भाजपाला दलितांची मते हवी आहेत आणि… ठाकरे गटाचा थेट आरोप
Edited by Manoj S. Joshi