Weather Today: उत्तर भारतात धुक्याच्या चादरीसह थंडीचा कहर, ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या

राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा , पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतात धुक्याची चादर पसरली आहे. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासून उत्तर भारतात थंडीच्या लाटा मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हरियाणा आणि उत्तर-पश्चिमधील उत्तर प्रदेश लगतच्या काही भागांवर चक्रीवादळाचे परिवलन तयार झाले आहे.

मागील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली. उत्तरेकडील राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पूर्वोत्तर भारतातील काही भागांत धुक्याची चादर पसरली असून गोठावणाऱ्या थंडीचा तडाखा बसत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्लीत आजचे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशात ठंडी वाढण्याची शक्यता

मध्य प्रदेशातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. परंतु हवामानाच्या अंदाजानुसार, येणाऱ्या काही दिवसांमध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसच धार, रतलाम आणि सागर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कहरासह लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सिवनी, बैतूल, इंदौर आणि उज्जैन यांसारख्या शहरांमध्ये थंडी वातावरण कायम आहे.

कसे असेल दिल्लीतील हवामान ?

देशाची राजधानी दिल्लीत थंडी कायम आहे. पुढच्या आठवड्यात तापमानात वाढ होऊन कमाल तापमान १७ ते २० डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान ७ ते ९ डिग्रीपर्यंत होऊ शकतं. तसेच १९ जानेवारीला दिल्लीमध्ये कोसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. SAFAR च्या माहितीनुसार, दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत देखील वाढ होताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता पाहिली असता आज (शनिवार) ३३९ इतकी नोंदवण्यात आली आहे. याचाच अर्थ दिल्लीत प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे.

कोणत्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर भारत, सिक्कीम आणि अंदमान-निकोबारच्या प्रदेशातील काही भागांत मध्यम वर्षाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, मुझफ्फराबाद आणि लडाखमध्ये पावसासह बर्फ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा : एसटीचे संपकरी ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ