‘अग्निपथ’च्या विरोधात काँग्रेसचे देशभरात आंदोलन

नवी दिल्ली/ मुंबई : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सैन्याचे कंत्राटीकरण करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जोपर्यंत युवकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी दिला आहे. (congress agitation against agneepath)

या योजनेनुसार देशभक्तीने प्रेरित युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील होता होईल आणि हे युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. या अग्निपथ योजनेसाठी ‘ऑल इंडिया ऑल क्लास’ आधारावर नावनोंदणी करण्यात येत असून पात्रतेसाठी वय 17.5 ते 2३ वर्षे दरम्यान आहे. सध्या भारतीय लष्कराचे सरासरी आयुर्मान 32 वर्षे आहे. या नव्या योजनेद्वारे हे सरासरी आयुर्मान 26 वर्षांवर आणण्याचा मानस संरक्षण मंत्रालयाचा आहे. मात्र ही योजना जाहीर होताच देशातील काही भागांत त्याविरोधात हिंसक पडसाद उमटले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध केला आहे.

मोदी सरकारच्या या अग्निपथ योजनेविरोधात भाईंदर, नाशिक, पुणे, लातूर, कोल्हापूर, चंद्रपूर, सिंदखेडा येथे आंदोलन करण्यात आले. सैन्यात भरती होऊन देशसेवेची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे भविष्य मोदी सरकार उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

नाना पटोलेंचे टीकास्त्र
अग्निपथ योजनेच्या माध्यमातून देशसेवेच्या व्रताला काळीमा फासण्याचे आणि बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच, ही योजना अपयशी ठरली असून हे अपयश झाकण्यासाठीच राज्यात राजकीय आखाडा तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला.