Homeदेश-विदेशCongress agitation against Amit Shah : काँग्रेसचे शहांविरोधात देशभरात आंदोलन, राजीनाम्याची करणार...

Congress agitation against Amit Shah : काँग्रेसचे शहांविरोधात देशभरात आंदोलन, राजीनाम्याची करणार मागणी

Subscribe

काँग्रेस प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रचार मोहीम राबविणार आहे. तर, 22 आणि 23 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते 150 हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भाषण करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेत हिवाळी अधिवेशनात संसदेच्या आवारात आंदोलन केले. याचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेससोबत अन्य विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र, अद्यापही शहा यांनी माफी न मागितल्याने आता काँग्रेस अमित शहांच्या विरोधात देशभरात आंदोलन उभे करणार आहे. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. (Congress agitation against Amit Shah will demand his resignation)

काँग्रेस प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रचार मोहीम राबविणार आहे. तर, 22 आणि 23 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते 150 हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. 27 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावात मोठी रॅली होणार आहे, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. तर, संसदेच्या अधिवेशनात राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. शहा यांच्या वक्तव्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. आजपर्यंत अमित शहा किंवा पंतप्रधानांनी माफी मागितलेली नाही. काँग्रेस हा मुद्दा प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत देशभरात मांडणार आहे, असेही के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Loksabha : महाविकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभेत केली ही कामगिरी; वाचा सविस्तर

तसेच, काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही याबाबतची माहिती देत म्हटले होते की, लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार आणि CWC सदस्य देशभरातील 150 वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतील. परंतु, काँग्रेसची रणनीती पाहून भाजपानेही विरोधकांना उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने आपल्या एससी/एसटी आघाडीला विधानसभेच्या सर्व जागांवर काउंटर मोहीम आखण्यास सांगितले आहे. यूपी भाजपा एससी/एसटी मोर्चाचे अध्यक्ष रामचंद्र कन्नौजिया यांनी पुष्टी केली की पक्ष तळागाळातील विरोधकांचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम सुरू करेल.


Edited By Poonam Khadtale