‘भारत जोडो’ यात्रेवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये रंगला कलगितुरा

national herald case rahul gandhi appearance before enforcement directorate delhi police bans party rally

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसेच देशात पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यानच्या या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. राहुल गांधी ‘भारत जोड़ो’ नव्हे तर, ‘भारत छोडो’ यात्रेसाठी प्रसिद्ध आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात होऊन 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. एकूण 150 दिवस आणि 3500 किलोमीटर ही यात्रा चालेल. ‘एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए तो जुड़ जाए अपना वतन’ असे सांगत ‘मिले कदम, जुडे वतन’ असे घोषवाक्य काँग्रेसने दिले आहे. या यात्रेत काँग्रेस पक्षाचा झेंडा पाहायला मिळणार नाही. मात्र या यात्रेवरून भाजपाने काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

तामिळनाडू भाजपाप्रमुख के. अन्नामलाई यांनी लागोपाठ ट्वीट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी ‘भारत जोड़ो’ नव्हे तर, ‘भारत छोडो’ यात्रेसाठी प्रसिद्ध आहेत. राहुल गांधी जेव्हा देशभ्रमंती करतील तेव्हा भारत कसा आत्मनिर्भर झाला आहे आणि ‘आमच्याने होणार नाही’ अशा भूमिकेतून बाहेर आला आहे, हे पाहून त्यांना आनंद होईल. ग्रामीण उपनगर आणि गावांचेही डिजिटलीकरण कसे झाले आहे, हे पाहून ते चकीत होतील, असे अन्नामलाई यांनी ट्वीट केले आहे.

काँग्रेसने देखील भाजपाच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. भाजपा बरोबर सांगत आहे की, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो’ आंदोलन केले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कधीच सहभाग घेतला नाही. पण आता राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे, असे काँग्रेसच्या खासदार मणिकम टागोर यांनी म्हटले आहे.