नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातमधील सुरत जिल्हा न्यायालयाने चार वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी याही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. जवळपास पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या टिप्पणीवरून रेणुका चौधरी हे पाऊल उचलणार आहेत.
सन 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथील एका सभेत, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजपाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल करताना राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन सुरत न्यायालयाने काल, गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तथापि, राहुल गांधी यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आला आणि या निर्णयाविरुद्ध अपील करता यावे यासाठी त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.
This classless megalonaniac referred to me as Surpanakha on the floor of the house.
I will file a defamation case against him. Let’s see how fast courts will act now.. pic.twitter.com/6T0hLdS4YW
— Renuka Chowdhury (@RenukaCCongress) March 23, 2023
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी या, पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला शूर्पणखा म्हटल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. 2018मध्ये राज्यसभेत केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी आपल्या हसण्यावरून टोला लगावला होता आणि आपल्या हास्याची तुलना अप्रत्यक्षपणे रामायणातील पात्र शूर्पणखेशी केली होती, असा दावा रेणुका चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे आता रेणुका चौधरी यांनीही पंतप्रधानांवर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, या ‘दर्जाहीन’ अहंकारी व्यक्तीने सभागृहात आपल्याला शूर्पणखा असे संबोधले. याबद्दल आपण मानहानीचा खटला दाखल करणार असून आता त्यावर न्यायालये त्याला किती तत्परतेने प्रतिसाद देतात, ते पाहू, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमके काय घडले होते?
राज्यसभेमध्ये 7 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. त्यावेळी कोणत्या तरी मुद्द्यावरून रेणुका चौधरी मोठ्याने हसल्या होत्या. यावर पंतप्रधानांनी राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना सांगितले, ‘अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की, रेणुका जींना काहीही बोलू नका. रामायण मालिकेनंतर असे हास्य ऐकण्याचे आज सौभाग्य मिळाले आहे.’ पंतप्रधान मोदींच्या या बोलण्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांमध्ये हास्याची लकेर उमटली होती.