Bharat Jodo Yatra : भारत जोडोच्या समारोपाला २१ पक्षांना निमंत्रण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला राजधानी दिल्लीतून सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी ९ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची यात्रा पूर्ण केली. त्यामुळे आता येत्या ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये ध्वजवंदन करून या यात्रेचा समारोप होणार आहे आणि या समारोपासाठी २१ पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी २१ पक्षांच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले आहे. येत्या ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेचा समारोप होणार असून त्यांना निमंत्रण देण्याबाबतचं पत्र लिहिण्यात आलं आहे. तसेच मी तुमची सकारात्मक प्रतिक्रिया आणि श्रीनगरमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रात म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी म्हटलंय की, ‘भारत जोडो यात्रा’ ही समाजात पसरवली जाणारी भीती आणि द्वेषाच्या विरोधात आहे. तसेच बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधातही ही यात्रा आहे. देशात वास्तविक आणि सत्यता काय आहे आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा, याकरिता ही यात्रा आहे. या यात्रेतून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या आहेत. तसेच यात्रेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, असं राहुल गांधी म्हणाले.

७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. तर ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरमध्ये ध्वजवंदन करून या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली राज्यांतून दिल्लीत पोहोचली आहे. मात्र, आता हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतून ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होणार आहे.


हेही वाचा : धक्कादायक! अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर बॉम्बस्फोट